तीन गझला : प्रतिभा सराफ

 



१.


उन्हे सुखाची सजली आता!

पुन्हा पालवी फुटली आता!


रात्रीची ती भयाण स्वप्ने

धुके होउनी विरली आता!


नवा ऋतू हा आला परतुन

दवात हिरवळ भिजली आता!


अबोल्यातही, नजर बोलली

अबोध भाषा कळली आता!


तुला पाहिले आणि अचानक

नवी ओळ मज सुचली आता!


तुझी हाक की भास मनाचे

गझल आतली नटली आता!


प्रेमकहाणी कशास सांगू?

खूण गुलाबी दिसली आता!


२.


एकाकी चालत होते, तेव्हाही अन् आताही !

वाऱ्याशी भांडत होते, तेव्हाही अन् आताही !


मी केले तुझ्याचसाठी भाषांतर शब्दफुलांचे

मौनाला गुंफत होते... तेव्हाही अन् आताही !


नात्यांची फुले गुलाबी अंगणात त्याच्या पडली

काट्यांना वेचत होते तेव्हाही अन् आताही !


नाहीस बोलला तूही पण बहुधा प्रेम असावे

अंदाजच बांधत होते तेव्हाही अन् आताही !


डोळ्यांवर मिरवत होते आकाश तुझ्या स्वप्नांचे

ताऱ्यांना मोजत होते... तेव्हाही अन् आताही !


ते तुझे असुनही नसणे, मज कधी उमगले नाही

भिंतीशी बोलत होते तेव्हाही अन् आताही !


३.


माझे कुणीच नाही जगणे नकोच आता

गेल्यावरी सखा... मज उरणे नकोच आता!


ती रात चांदण्यांची आली कधी नि गेली

काळोख दाटल्यावर पुसणे नकोच आता


तो गीत गायचा, त्या धुंदीत नाचले मी

परक्या सुरावटीने झुलणे नकोच आता


ओलावल्या क्षणांचे ते झाड वाळले रे

अश्रूत कोरड्या या रुजणे नकोच आता


नाहीच आज कोणी समजूत काढण्याला...

कोणापुढे रडावे? रुसणे नकोच आता


....................................................

प्रतिभा सराफ,

इ-१५०३, रूणवाल सेंटर,

गोवंडी स्टेशन रस्ता,

देवनार, मुंबई-४०००८८ 

मो:९८९२५३२७९५


No comments:

Post a Comment