१.
खण दुःखाचे रोजच उपसत राहू
बिनकामाची रद्दी टाकुन देऊ !
पुण्य-पाप मोजणे परवडत नाही
जगणे आहे तोवर जगून घेऊ
भविष्य नाही तुटलेल्या ताऱ्याला
इच्छांचे रडगाणे गातच राहू
श्वास मोकळा करू बंद खिडक्यांचा
कुरकुरणाऱ्या कडीस वंगण घालू
टाळू अलगद किंकाळ्या दुनियेच्या
कानांवर हातांना दाबुन ठेवू
कुठे निघालो, हेही माहित नाही
आकाशाच्या कक्षा लांघत जाऊ
भटकत राहू अज्ञाताच्या वाटा
कुणास ठाउक कुठे नाहिसे होऊ!
२.
काळोखाच्या भिंतीवरती, पाल चुकचुकत गेली--
काळ्याबेऱ्या आशंकांचे मंत्र पुटपुटत गेली!
अत्तर काढुन, पाकळीस मी दूर लोटले होते,
तिथेच अमुच्या ललाटरेषा नियती जुळवत गेली
कुणी कुणाशी अक्षर सुद्धा बोलू शकले नव्हते,
दोघांमधुनी ओळ नेमके काय गुणगुणत गेली?
सहा ऋतूंच्या, सोहळ्यांतही सहसा रमले नाही,
तुझी आठवण ऋतू सातवा होउन रिझवत गेली!
गर्दीमध्ये असूनसुद्धा कुठेच नसते हल्ली,
त्यामुळेच की काय, माणसे अंतर राखत गेली!
कधी कधी तर मलाच माझे समजत नसते काही,
पुढे पुढे, समजूत मनाची मलाच फसवत गेली!
उजेडातले जुने मनसुबे उधळुन गेले सारे,
अंधाऱ्या गर्भात भयाची दहशत पसरत गेली!
३.
कितीदा लोकशाहीची,इथे थट्टा उडत आहे?
चकाचक इंडिया तेथे.. इथे भारत कण्हत आहे!
रुतत गेले,कुजत गेले...तरी कळले कसे नाही?
तुझ्या पायातले धसकट...अताशा ठसठसत आहे!
किती तांदूळ वाया चालले उधळून नवरीवर,
भिकारी पायऱ्यांवरती भुकेने तडफडत आहे!
विनादिक्कत करू लग्ने हव्या त्या 'डेस्टिनेशनवर',
पुढारी बाप असल्याची नशा जोवर चढत आहे!
तुझ्या दारात फेरारी...इथे खड्डयातले रस्ते...
किती, 'आ ' वासुनी सारे,खुळी जनता बघत आहे!
तुझ्याही योजनांमध्ये कपटनीतीच दडलेली,
मनाला रास्त शंका ही,कधीची पोखरत आहे !
भले तू खूप मोठा हो...तुझे मस्तक,भिडो गगना,
नको विसरू...तुझ्या पायातळी काही जळत आहे!
................................
अंजली दीक्षित-पंडित
छत्रपती संभाजीनगर
९८३४६७९५९६
