Showing posts with label डॉ.विद्या देशपांडे. Show all posts
Showing posts with label डॉ.विद्या देशपांडे. Show all posts

तीन गझला : डॉ.विद्या देशपांडे

 


१.


अंधाराची काळी ज्वाला घेरत जाते

भेदरणाऱ्या आत्म्याला मी थकवत जाते


दिक्कालातुन रव घुमतो मग विश्वासाचा

रक्तामधल्या कंपाला मी निववत जाते


खोटी दुनिया खोटे सारे अवतीभवती

सत्याला मी नक्षत्रावर कोरत जाते


आठवणींच्या खेळामधुनी खजिना मिळतो

आवरताना त्यातच मीही हरवत जाते


उरल्या सुरल्या आयुष्याचे देणे घेणे

एकाकी मी सावधतेने मिटवत जाते


२.


वादळाने गाठलेले ऐनवेळी

शीड माझे फाटलेले ऐनवेळी 


पाहुनी मृगजळ बिलोरी दूरवरती 

पाय माझे पोळलेले ऐनवेळी


तोडुनी नात्यास मीही जात होते 

भाबडे मन भाळलेले ऐनवेळी


घेत होते मी भरारी हिंमतीने 

पंख माझे छाटलेले ऐनवेळी 


पाहिले मी स्वप्न साधे सोबतीचे 

हात माझे सोडलेले ऐनवेळी 


मारल्या गप्पा कितीही दानतीच्या 

हात  मागे घेतलेले ऐनवेळी 


सोबतीने गीत मीही गात होते 

सूर माझे भंगलेले ऐनवेळी


३.


कैफ सारा निर्मितीचा का असा उतरून गेला

शोध शास्त्राचा जगाला कोडगे बनवून गेला


पाहिली डोळ्यातली मी भाकरीची भूक व्याकुळ

दौलतीचा माज साऱ्या जाणिवा मिटवून गेला


जाणिवांचे पोरकेपण अंतराला खात गेले

काळजाचा एक कप्पा आज का उसवून गेला


काहिली झाली जिवाची सूर्य माझा कोपलेला

कोंभ आशेचा नवासा गारवा उधळून गेला


आज अवचित गाठ पडला  चेहरा तो ओळखीचा 

सांज ओलेत्या मनाचा मोगरा बहरून गेला


..................................................