Showing posts with label विजय जोशी. Show all posts
Showing posts with label विजय जोशी. Show all posts

तीन गझला : विजय जोशी

 



१.

नीती-विचार त्यांनी वेशीस टांगलेला
अमुच्या मतामतांचा बाजार मांडलेला

तुमच्या उपोषणांचे देऊ नका पुरावे
उपवास नित्य अमुच्या दारीच थांबलेला

आतंकवाद भीषण आत्ता जगास कळला,
'हिजबुल-हमास' आम्ही आधीच भोगलेला

टक्के किती कुणाला? हा प्रश्न टांगलेला,
अमुचा विकास बहुधा जातीत भरडलेला

शिकवू नये कुणीही आम्हास शांति-नीती,
गौतम-विचार,गांधी येथेच वाढलेला

२.

जखमेवरती मनास माझ्या औषध आहे तुझे बोलणे,
विरह-वाळवंटाला मोहक मृगजळ भासे तुझे लाजणे

प्रेमामध्ये रुसवे, फुगवे उदास करती खोल मनाला,
अबोलतेच्या तप्त रणाला तुषार-सिंचन तुझे हासणे

कितीक भेटी झाल्या अपुल्या तरी अनामिक ओढ लागते,
मंदिर-मूर्ती स्वरूप सुंदर, रूप मनोहर तुझे देखणे

ऋतू मागुनी ऋतू बदलतो बहरानंतर पानगळीचा,
छंद लागला तुझ्या सोबती रोज ऋतू शृंगार मांडणे

आवडते मज तुझ्या प्रेमबहराची मादक फुले वेचणे,
बहरुन येता प्रणयामध्ये कठीण असते तुला रोखणे

३.

युद्धाने बेचिराख झाले जीवन सारे
अंती म्हणती तहात बोलू, उघडू दारे

पत्नी म्हणुनी दे शब्दांना किंमत थोडी
नकोत वचने, नुसती स्वप्ने, आणिन तारे

स्वभाव सुंदर कुटुंबवत्सल तिने असावे
नकोच नुसते रंगरूप अन् डोळे घारे

हात जोडुनी मंत्री-संत्री आले दारी,
समजुन गेलो निवडणुकीचे आले वारे

निर्णय अंतिम सांगुन टाका जनतेलाही,
खूप जाहली भाषणबाजी, पोकळ नारे

...................................................
विजो (विजय जोशी)
डोंबिवली (मालवण  - सिंधुदुर्ग)
9892752242