Showing posts with label सुधा नरवाडकर. Show all posts
Showing posts with label सुधा नरवाडकर. Show all posts

तीन गझला : सुधा नरवाडकर

 



१.


क्षण सौख्याचे आनंदाचे

द्विगुणित करते गझल-मोहिनी

दुःखामध्ये सांत्वन करुनी

अश्रू पुसते गझल-मोहिनी!


राज्ञीचा बघ तोरा मिरवत

येते माझी गझल-मोहिनी

वंदन करुनी करण्या सेवा

आतुर बनते गझल-मोहिनी


कधी कधी मी उदास बनते

नैराश्याने खचून जाते

लाडीगोडी करून माझी

मला हसवते गझल-मोहिनी


प्रपंच करता थकते भारी

क्षणभर मानस अशांत बनते

गुच्छ फुलांचे सवे घेउनी

मला फुलवते गझल-मोहिनी


गढूळलेले जीवन बघुनी

रात्रंदिवशी मन काजळते

पथ दाखवुनी ऊर्जा देण्या

उभी राहते गझल-मोहिनी


मनात माझ्या ठाण मांडती

भेदभाव अन् हेवेदावे

प्रेमाची मज दोन अक्षरे

सतत शिकवते गझल-मोहिनी


मानव जेव्हा असुर होउनी

समाजात मग नर्तन करतो

शब्दांचे पण शस्त्र घेउनी

सतत झगडते गझल-मोहिनी

   

२.


नियतीचा हा खेळ पाहुनी

रात्रंदिवशी रडत बसावे?

फिनिक्स बनुनी पुन्हा उठावे

उरलेल्यास्तव हसत जगावे


ज्येष्ठ असे मी थकलो आता

विचार येतो किती जगावे?

असे शब्द पण नको मुखातुन,

छंद मनाचे जोपासावे


जो तो अपुल्या व्यापामध्ये

संवादाला कुणीच नाही

नातवांसवे खेळ खेळुनी

त्यांच्यामध्ये बाल्य बघावे


सासूबाई सदा बोलते,

मनासारखे जगणे नाही

चुकतेस मुली प्रपंचात बघ

त्यागामध्ये सुख शोधावे


हवे हवेला शेवट नसतो

मानस अपुले अशांत बनते

इतरांच्या बघ मोदामध्ये

चिंब न्हाउनी फुलत रहावे


३.


निज हाडाची काडे करुनी

घरकुल रक्षण करतो बाबा

काट्यांमधुनी अनवाणी पण

चालत असता हसतो बाबा


रात्रंदिवशी कर्तव्याचे

ओझे असते खांद्यावरती

पायामधली नस तटतटते

तेव्हा पण ना थकतो बाबा


दसऱ्या दिवशी सर्वांसाठी

भारी कपडे आणत असतो

निज देहावर ठिगळाची पण

बंडी घालुन सजतो बाबा


त्याच्यासाठी आई दैवत,

दिनरात्रीला सेवा करतो

गच्चीवर मग क्षणभर जातो,

स्फुंदत स्फुंदत रडतो बाबा


ताईवरती माया त्याची

तळहाताचा फोडच दुसरा

वर संशोधन करतो जेव्हा

नकळत डोळे टिपतो बाबा

...................................................