Showing posts with label 'संविधान संस्कृती'चा उद्घोष करणारी गझल : सूर्या तुझ्या दिशेने : संजय ओरके. Show all posts
Showing posts with label 'संविधान संस्कृती'चा उद्घोष करणारी गझल : सूर्या तुझ्या दिशेने : संजय ओरके. Show all posts

'संविधान संस्कृती'चा उद्घोष करणारी गझल : सूर्या तुझ्या दिशेने : संजय ओरके




'संस्कृती निर्माण करणारा प्राणी म्हणजे माणूस' अशी एक वैशिष्ट्यपूर्ण व्याख्या अलीकडे माणसाची केली जाते. इतर प्राण्यांपेक्षा मानवप्राण्याचे व्यवच्छेदक लक्षण वरील व्याख्येत व्यक्त झाले आहे. पण असे असले तरी सर्व समाजाची एकच एक संस्कृती असते, असे मात्र नाही. सतत बदलत जाणे हे एक संस्कृतीचे लक्षण असण्यासोबतच अनेक पिढ्यांची ती सामूहिक निर्मितीही असते.

     पारंपरिकता आणि आधुनिकता अशा दोन्ही वैशिष्ट्यांचा संस्कृतीमध्ये अंतर्भाव होतो. म्हणजे
सर्व समूहाला एकत्रित बांधणारी काही समान वैशिष्ट्ये संस्कृतीमध्ये असतात.

     'भारतीय संस्कृती' असा उल्लेख करताना वैदिक संस्कृती सर्व भारतीयांवर जाणीवपूर्वक लादल्याचा आरोप होतो आणि तो खराही आहे. विविध जाती, धर्म, पंथ, वर्ण, भाषा, बोली, परंपरा या सगळ्या गोष्टी असताना आणि आधुनिकतेचा कुठलाच स्वीकार नसताना मनुस्मृतीने लादलेली ही संस्कृती टिकवण्याचं काम इथल्या धर्मानं केल्याचं आपणास दिसते. म्हणजे बदलत्या काळानुरुप धर्म आधुनिक व्हायला पाहिजे होता पण तसे न होता आधुनिकतेलाच धर्माचा मुलामा चढवण्याचं काम इथल्या धर्मव्यवस्थेनं मजबूत केल्याचं आपल्याला दिसून येते.

     या देशात सर्वच वेगळं. आदिवासींचं स्वतंत्र अस्तित्व आणि त्यांची संस्कृती, वर्णव्यवस्थेनं नाकारलेला अवर्ण आणि त्यांचं जगणं, आक्रमणातून आलेले मुस्लिम, इंग्लिश, पौर्तिगीझ, फ्रेंच, डच यांच्या संस्कृती... या सगळ्या पार्श्वभूमीवर 'भारतीय संस्कृती' या भूमीवर आपल्याला कुठे दिसत आहे असं म्हणताच येत नाही.

     हे सगळं असताना हा देश राष्ट्र म्हणून उदयास यावा,
त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहवं, तो सार्वभौम असावा आणि प्रत्येक जण नागरिक या संज्ञेस प्राप्त व्हावा म्हणून भारतीय प्रजासत्ताक निर्माण करण्यात आलं. बहुमताचं 
सरकार असलं तरी कायदा सर्वोच्च असेल आणि कायद्यापुढे सगळे समान असतील अशी 'संवैधानिक संस्कृती' आम्ही भारताच्या लोकांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला आपल्या संविधानसभेत स्विकृत केली.

     कवी आणि गझलकार रमेश बुरबुरे यांचा गझल संग्रह 'सूर्या तुझ्या दिशेने' संविधान संस्कृती निर्माणाचा उद्घोष करणारा दस्तावेज आहे, असं नमुद करताना आनंदाची अनुभूती होते. त्यातल्या सबंध गझला उस्फूर्त आहेत आणि जाणीवपूर्वक लिहिल्या गेल्या आहेत. त्यावर संस्कार करताना विषय ठरवून निवडले आहेत. विविधतेतून कल्याणकारी राज्याची संकल्पना साकारण्यासाठी जे संविधान साकार झाले आहे, ते इथल्या प्रत्येक नागरिकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग व्ह्ययला पाहिजे तेव्हाच सामाजिक आणि आर्थिक लोकशाही यशस्वी होईल, त्याचा प्रचार आणि प्रचाराची जबाबदारी कवी रमेश बुरबुरेंच्या गझलेने कार्यकर्त्याच्या भूमिकेतून जाणीवपूर्वक स्वीकारली आहे.

'जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते
रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते'

     व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून, समाजाचा जबाबदार घटक आणि वैश्विक धरोहर म्हणूनही ही संविधान संस्कृती माणसाच्या कर्तृत्वाच्या भराऱ्यांना दिशा देण्याचे कार्य करत असते. या भराऱ्यांना आपल्या इच्छित उद्दीष्टांपर्यंत सुखासीन पोचण्यासाठी लोकशाहीच्या सगळ्या स्तंभांनी आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या पाहिजेत -

'छाप तू छापायचे तर वास्तवाला
बातम्यांना तू नको लावू मसाला'

किंवा

'डाग चारित्र्यास नाही त्यांचिया जर
भीत इतके का असावे लेखकाला?'

     लोकशाहीच्या आणि मानवी मूल्यांच्या चिरंतनासाठी
साहित्याची / साहित्यिकांची भूमिका आणि वर्तमानपत्राची आणि त्यात लिहिणाऱ्या संपादक / पत्रकारांच्या चेतना आणि निष्ठा देश आणि मूल्यांवर असणे किती गरजेचे आहे, याची आठवण नव्याने करुन देण्याचं काम रमेशची गझल करतेय. आपलं समर्पण जात आणि धर्मासाठी नसून देश आणि संविधानावर असेल तरच हा देश अखंड राहील, त्यासाठी संविधान अंगीकारण्याचं आवाहन करताना...

'मी भारतीय आधी जाती नि धर्म नंतर
इतके मला कळाले घटनेस वाचल्यावर'

     जातीविरहीत समाज निर्माणासाठी आणि धर्मनिरपेक्ष सहजीवनासाठी आपल्याला संविधान संस्कृतीचा स्विकार करुन तिचे संस्कार आपल्या येणाऱ्या पिढ्यांवर करावे लागतील याची जाणीव ठेवून सन्मानाचे जीवन बहाल करणाऱ्या संविधान निर्मात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना रमेश बुरबुरे लिहितात-

'मीच नाही चालतो हा देश ज्यावर
स्वाक्षरी आहे तुझी ज्या पुस्तकावर'

     हजारो पिढ्यांची गुलामी फक्त आणि फक्त संविधानाने घालवली आणि मुक्त जगण्याचा जाहीरनामा
प्रकाशित झाला. आता हा मानवमुक्तीच्या प्रलेखाकडे
वाकडी नजर करुन पाहणाऱ्यांना इशारा देण्याचं कामही
गझलकार तेवढ्याच विश्वासानं करतो.

   बहुमताचं सरकार स्थापित झाल्यावरही कायद्याच्या चौकटीत राहूनच देशाचा कारभार करावा लागतो. देश ही सार्वभौम संकल्पना आहे.धर्माच्या राज्यातली मनमानी इथे चालत नाही. विशेषाधिकारांना इथे थारा नाही आणि म्हणूनच इथे राजा आणि प्रजा नाही; 'आम्ही भारताचे लोक' आहेत.

'लालसेने मी पदाच्या शीष नमवत नाही
अन् कुणाच्याही पुढे शेपूट हलवत नाही'

     बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या सामान्य जिवांच्या जगण्याला प्रतिष्ठा बहाल केली. कोणत्याही भेदभावाशिवाय माणसं समान आहे हे राज्यघटनेच्या
माध्यमातून कायम करण्याचं आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचे अविश्वसनीय महत्कार्य त्यांनी केलं त्यासंबंधी रमेश बुरबुरेंची गझल अशी अभिव्यक्त होते -

'संविधानाला समोरी ठेवते माझी गझल
वंचितांचे हक्क लढुनी मागते माझी गझल '

'ती दुजासाठी मला लढणे नि झिजणे शिकविते
मज जणू माता रमाई वाटते माझी गझल'

     गझलेला रमाईची उपमा देणारी रमेशची गझल मला
संविधानातल्या एकेका स्वयंभू कलमासारखी वाटते, ज्याच्या भरवशावर आधुनिक प्रबुद्ध भारत उभा राहिला आहे.
     रमाईचं बाबासाहेबांवर असणारं नितांत समर्पण आणि त्यातून घडत जाणारा कर्तृत्वाचा अजिंठा म्हणजे बाबासाहेब! ह्या वैश्विक प्रेरणांचा वैचारिक स्पर्श झालेली
गझल लढणे शिकवते, झिजणे शिकवते. अशावेळी ती
गझल रमाई वाटणे म्हणजे सांविधानकर्त्याच्या सावलीलाच अभिवादन. खरच अभिनव.

     भारतीय लोकशाहीच्या विधायक संचलनासाठी आणि पर्यायाने प्रबुद्ध भारताच्या निर्माणासाठी या संग्रहातल्या गझलेचा प्रत्येक शेर आणि ओळ झपाटल्यागत मांडणी करताना दिसते. ही मांडणी गझलकार हवेत करत नाही; मूल्यांवर अधिष्ठित या नवनिर्माणाची ब्लूप्रिंट त्याच्या मेंदूत तयार आहे, जी बाबासाहेबांनीच आखून दिली आहे. आपल्या जीवनातले
दु:ख घालवून सुखाची निर्मिती करतानाच शोषणमुक्त समाजाच्या निर्माणासाठी हे करावेच लागेल -

'घे जरा जयभीम माझा कर नमो बुद्धाय मित्रा
माणसांना जोडण्याचा ना दुजा पर्याय मित्रा '
                           
'बहुमताने पक्ष आता आपला निवडून आणा
राहिला ना कोणताही आज तरणोपाय मित्रा '

     "सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय क्रांती अर्थहीन आहे." इतिहास किंवा वर्तमानात झालेल्या राजकिय बदलांची अबोर्शनं आपण अनुभवलेली आहेत. सामाजिक आणि आर्थिक पाया कमकुवत असणे ही त्यामागची राज्यकर्ते आणि मतदार यांना न उमगलेली कारणे होय.

     "बुद्ध और बाबासाहब को छोडना हमारे लिए प्राण त्यागने के समान हैं."  फक्त बाबासाहेब किंवा फक्त बुद्ध स्वीकारणे हा स्वत:शी द्रोह करण्याचा प्रकार आहे. आपल्याला खरेच परिवर्तन किंवा क्रांतीची अपेक्षा असेल तर बाबासाहेबांना अपेक्षित बुद्ध स्वीकारणे, त्या तत्त्वांना अनुसरुन वागणे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणे याशिवाय तरणोपाय नाही. त्यासाठी जाती आणि धर्मविरहित धम्मशासनाची निव टाकणे म्हणजेच सांविधान संस्कृतीला अनुसरणे याशिवाय आजच्या घडीला समस्त देशातील आणि विश्वातील नागरिकांपुढे दुसरा पर्याय खचित दिसत नाही.

     ' सूर्या तुझ्या दिशेने' या गझलसंग्रहाच्या नावातच रमेश बुरबुरेंनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. ही भूमिका संपूर्ण सत्याला स्वीकारण्याची आहे. बुद्ध-अशोक-आंबेडकरांना अनुसरण्याची आहे. पर्यायाने समता-स्वातंत्र्य-न्याय-बंधुतेवर आधारित संविधान संस्कृती तत्व जगण्याची आहे आणि प्रबुद्ध भारताच्या निर्माणाचीही आहे.

     या गझल संग्रहात एकूण शहात्तर गझला आहेत.
गझलकाराने संग्रह 'प्रज्ञासूर्याच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या तमाम निष्ठावान कार्यकर्त्यांना समर्पित' केलाय. रमेश कार्यकर्त्याच्या भूमिकेतून आंदोलनाच्या दिशेने चालण्याचे तरुणांना आवाहन करत आहे. या संग्रहाचे मुखपृष्ठ आणि रेखाटने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार बळी खैरे सरांनी, प्रस्तावना सिद्धहस्त गझलकार डॉ.सिद्धार्थ भगत यांनी केली आहे. सुप्रसिद्ध नाट्यकलावंत प्रा.विलास भवरे सरांनी
सदिच्छा दिल्या आहेत. या संग्रहासाठी ब्लर्बच्या
रुपाने आंबेडकरी आंदोलनाचे भाष्यकार डॉ.अशोक पळवेकर सरांनी प्रोत्साहन दिलेले आहे.

     उपरोक्त सर्व प्रतिभा आंबेडकरी आंदोलनातील दादा माणसं आहेत.या सर्वांचे हात एकसाथ रमेशच्या गझल संग्रहासाठी एकवटले आहेत. संविधान संस्कृतीच्या निर्माणासाठी त्यांच्यासहीत आपलेही बाहू सरसावले पाहिजे आणि अशा अभिव्यक्तींचा परिवर्तनाचे सशक्त माध्यम म्हणून उपयोग केला पाहिजे.

     आंबेडकरी गझलेच्या महामार्गावर जी मोजकी  milesstones आहेत त्यात आणखी एका दिशादर्शकाचे मन:पूर्वक स्वागत आणि अभिनंदनही !

     येणार्‍या काळात रमेशची गझल आंदोलनाच्या मैदानावर तरुणांचं नेतृत्व करताना आपल्याला निश्चितच
बघायला मिळेल अशा सदिच्छा व्यक्त करतो, ज्यातून सम्यक परिवर्तनासाठी समस्त तरुणांचा संविधान संस्कृतीचा उद्घोष आपणास निश्चित ऐकता येईल.

.................................                                                                     संजय ओरके , पुलगाव                                 8805623969