५ ऑगस्ट २०२४, सोम.रोजी संध्या.७.३० च्या सुमारास गझलकार आणि भूलतज्ज्ञ डॉ.प्रशांत पाटोळे ह्यांचा मला अचानक फोन आला आणि फारच अनपेक्षित, धक्कादायक आणि दु:खद वार्ता त्यांनी माझ्या कानावर घातली. ते म्हणाले, "सर, फारच शॉकिंग बातमी आहे! आपल्या रघुनाथ पाटलांचं आत्ताच थोड्या वेळापूर्वी आकस्मिक निधन झालंय." मला हे ऐकून काय बोलायचं, ते सुचेनाच. कारण आदल्याच दिवशी म्हणजे ४ ऑगस्ट २०२४, रविवार रोजी आम्ही संभाजी उद्यान इथल्या साहित्यिक कट्ट्यावर 'साहित्य- प्रकाश' आयोजित गझलकट्टा क्र.८५ साठी काही गझलकार महिन्यातून एकदा दर रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० ह्या वेळेत जमतो, तसे जमलेलो होतो. अगदी पुण्यात अतिमुसळधार पाऊस चालू असतानाही एकमेकांच्या नव्या, ताज्या गझला ऐकायला मिळतात म्हणून आम्ही दहाएक गझलकार तरी जमलेलो होतो. डॉ.प्रशांत पाटोळे हे थेरगावहून येताना आपल्या कारमधून रघुनाथ पाटलांना काळेवाडी इथून घेऊन आलेले होते. 'गझलकट्ट्या' वर रघुनाथ पाटलांनी ऐकवलेल्या दोन ताज्या,नव्या हझलांनी आम्ही खूपच हसलो होतो आणि आज मात्र त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्तानं आम्हां गझलकारांना अक्षरशः रडवलं होतं.
तसा रघुनाथ पाटलांचा आणि माझा परिचय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागानं माझ्या आणि प्रदीप निफाडकराच्या पुढाकारानं ६ फेब्रु.२०११ रोजी सुरू केलेल्या गझलकारांच्या मासिक बैठकीच्या अभिनव उपक्रमामधून झालेला होता.ह्या बैठकीला प्रामुख्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन महापालिकांच्या कार्यकक्षेत राहणारे वीस - पंचवीस जुने-नवे गझलकार आवर्जून उपस्थित राहत. प्रत्येकानं आपली फक्त एकच आणि तीही नवीनच गझल सर्वांना ऐकवायची आणि त्यानंतर मग सर्वांनी तिच्यावर तुटून पडायचं म्हणजेच साधकबाधक चर्चा करायची, असं ह्या उपक्रमाचं स्वरूप होतं आणि आहे. मी विद्यापीठातून मराठी विभागप्रमुख ह्या पदावरून ३१ मे २०१७ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रदीप निफाडकरला ह्या उपक्रमाला वेळ देणं शक्य होईना म्हणून त्यानं उपस्थित राहणं बंद केलं. मी मात्र हा उपक्रम श्रीकृष्ण शाळिग्राम आणि वसंत गोखले ह्या दोघांंच्या विनंतीवरून संभाजी उद्यानमधल्या साहित्यिक कट्ट्यावर 'साहित्य - प्रकाश' ह्या त्यांच्या साहित्यसंस्थेच्या बॅनरखाली 'गझलकट्टा' ह्या नावानं आजही चालूच ठेवलेला आहे. काही गझलकार वेळात वेळ काढून आजही ह्या उपक्रमात हमखास सहभागी होत असतात. रघुनाथ पाटील हे त्यापैकी एक होते. ते एकटे यायचे नाहीत, तर पिंपरी चिंचवड भागातल्या अनेक जुन्या-नव्या गझलकारांना आपल्या बरोबर घेऊन यायचे. विद्यापीठात हा उपक्रम चालू होता, तेव्हा ते प्रशांत पोरे ह्याच्या कारमधून यायचे. विद्यापीठातला हा उपक्रम आम्ही संभाजी उद्यानात स्थलांतरित केल्यावर पिंपरी चिंचवड भागातल्या गझलकारांना जाणंयेणं लांब पडू लागल्यानं त्यांनी 'गझलपुष्प' नावाची केवळ गझलेसाठी कार्य करणारी नवी संस्था २०१८ साली स्थापन केली. त्यात रघुनाथ पाटील, प्रशांत पोरे, अभिजित काळे, दिनेश भोसले, संदीप जाधव वगैरे गझलकारांचा पुढाकार होता. तरी अधूनमधून का होईना, पिंपरी चिंचवड भागातले काही गझलकार हे संभाजी उद्यानमधल्या 'गझलकट्ट्या' ला आवर्जून उपस्थित राहायचेच. रघुनाथ पाटील हे त्यापैकी एक होते. ते अलीकडे डॉ.प्रशांत पाटोळे ह्यांच्या कारमधूनच येत असत.
रघुनाथ पाटील हे मूळचे जळगावचे होत. ते सुमारे ३५ - ४० वर्षांपासून पुण्यात राहू लागलेले होते. सुरुवातीला ते कॅंपमध्ये फर्निशिंगच्या म्हणजे गादी आणि सोफासेट तयार करण्याच्या दुकानात कामाला होते. नंतर ते चिंचवड भागात सायकलवर फिरून कुरिअर सेवा देऊ लागलेले होते. अलीकडे त्यांची दोन्ही मुलं किरण आणि संजय ही कमवू लागलेली होती.त्यामुळं त्यांनी पिंपरी चिंचवड भागात काळेवाडी इथं तापकीरनगरमध्ये नवभारत कॉलनीत छोटंसं घर बांधलेलं होतं. तिथं ते पत्नी मीना, दोन मुलं किरण आणि संजय, तसंच सुना आणि नातवंडं अशा परिवारासह राहू लागलेले होते. तसे त्यांचे कष्टाचे दिवस संपुष्टात आलेले होते. मात्र त्यांना तीव्र स्वरूपाचा मधुमेह जडलेला होता. म्हणून त्यांना रोज इन्शुलिन घ्यावं लागत असे. मृत्युसमयी त्यांचं वय ६१-६२ वर्षांचं होतं.
रघुनाथ पाटील हे मोकळेपणानं बोलायचे, हास्यविनोद करायचे. मात्र त्यांनी आपलं कष्टप्रद जीवन, आपल्या आरोग्याच्या समस्या, आपल्या अडीअडचणी कुणाला मोकळेपणानं सांगितल्या असतील, असं मला वाटत नाही. ते सतत हसतमुख असायचे आणि आपल्या मिश्किल स्वभावानं ते आपल्या आसपासच्या लोकांना हसवत राहायचे. त्यांच्या ह्या स्वभावानं, तसंच त्यांच्या सहज, सोप्या, पण प्रभावी गझलांनी, हझलांनी त्यांनी पिंपरी चिंचवड, पुणे इथलेच नव्हे; तर महाराष्ट्रभरातले अनेक मित्र जोडलेले होते. पैकी पनवेलचे रवींद्र सोनवणे आणि डोंबिवलीच्या सौ.कल्पना गवरे ह्या दोन गझलकारांसोबत ते 'पळसाची पाने तीन' ह्या नावाचा गझलेतर कविता आणि गझल ह्यांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम करीत. मुंबई परिसरात त्यांचे आठ-दहा तरी कार्यक्रम झालेले असावेत.
रघुनाथ पाटील हे तसं उशिरानंच म्हणजे वयाच्या ३२ व्या वर्षी काव्यलेखनाकडे वळले होते. गझललेखनाकडे तर ते आणखीनच उशिरा म्हणजे वयाच्या ३९ व्या वर्षी वळले होते. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘व्यथा … मातीची कथा' हा २०१३ साली प्रकाशित झाला होता, तर त्यांचा दुसरा काव्यसंग्रह ‘एक सावली तुझी पुरेशी' हा ७ फेब्रु.२०२१ रोजी प्रकाशित झाला होता. हा दुसरा काव्यसंग्रह हाच त्यांचा पहिला गझलसंग्रह होय. त्याला त्यांच्या आग्रहास्तव मी सहा-सात पृष्ठांची प्रस्तावना लिहिलेली आहे. हा संग्रह पिंपरी चिंचवड इथल्या ‘गझलपुष्प’ ह्या समूहानं प्रकाशित केला आणि त्याचं ह्याच समूहानं समारंभपूर्वक प्रकाशनही केलं. शंभर गझलांच्या ह्या संग्रहात त्यांचा हसरेपणा आणि खेळकरपणा व्यक्त करणाऱ्या अनेक गझला आहेत.त्यातल्या काही द्विपदी अशा :
१.
हसुनी जरी बोलती सर्व पोरी
मला कोण आहे ‘हमारी कळेना! (ग.क्र.४७)
२.
माझा रिमोट आहे हातात बायकोच्या
नाही म्हणावयाची काहीच सोय नाही!(ग.क्र.७०)
३.
प्रेम तुझ्यावर खरेच करतो,आईशप्पथ!
चार जणींना हेच सांगतो, आईशप्पथ!(ग.क्र.५०)
रघुनाथ पाटील हे अलीकडे हझला (हसऱ्या गझला, विनोदी गझला) लिहू लागलेले होते. म्हणून मी त्यांना ‘आपण तुमचा लवकरच हझलसंग्रह प्रकाशित करू’, असं सांगत आलेलो होतो. परंतु तो योग नियतीला त्यांच्या हयातीत आणणं मान्य नव्हतं की काय, न कळे! मी त्यांच्या अंत्यविधीप्रसंगीच्या शोकसभेत,तसंच नंतर म.सा.प.च्या पिंपरी चिंचवड शाखेनं आयोजित केलेल्या शोकसभेतही ‘रघुनाथ पाटील ह्यांचा हझलसंग्रह प्रकाशित करणं,हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल’, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. माझ्या ह्या भावनेला म.सा.प.च्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, तसंच डोंबिवली इथल्या स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ.कल्पना गवरे आणि पनवेलचे गझलकार रवींद्र सोनवणे ह्या तिघांनी तत्काळ उचलूनही धरलं होतं. रघुनाथ पाटलांच्या नियोजित हझलसंग्रहातल्या काही द्विपदी अशा :
१.
पुणेकरांचे सारे काही अचाट बाबा,
जोक कालचा आत्ता हसले जाने भी दो!
२.
बायकोस लाडाने म्हटले,” लव यू, पिल्लू”,
कपाळावरी तिच्या केवढी आठी आहे!
३.
शरीर थरथर करते आणिक
वय झालेले,
तरी फुकट एस्टीत जायचे म्हणतो आहे!
थोडक्यात, रघुनाथ पाटील ह्यांच्या रूपानं नुकताच कुठं एक चांगला गझलकार आणि हझलकार मराठी गझलसृष्टीला लाभलेला होता, तोच काळानं त्यांच्यावर अचानक झडप घातली.
'गझलेच्या अवघड दुर्गाला लाख पायऱ्या
अजून केवळ एक पायरी चढलो आहे! '
असे स्वतः त्यांनी उद्गार काढलेले होते. खरं तर त्यांच्यामध्ये गझलेच्या अवघड दुर्गाच्या अनेकानेक पायऱ्या चढण्याची क्षमता निश्चित होती.मात्र काळानं त्यांना उसंतच दिली नाही.
'गझलेसाठी हयात द्यावी हसून आपण
एक दिवस मग गझल आपली हयात होते '
हे रघुनाथ पाटलांचं मत नवोदित गझलकारांनी स्वतःच्या मनावर कोरून ठेवावं, असं मला वाटतं. अशा रघुनाथ पाटलांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
....................................................
डॉ.अविनाश सांगोलेकर,
डी- २०२, विंडसर रेसिडेन्सी, बालेवाडी फाटा, बाणेर, पुणे-४११०४५
९८ ५० ६१ ३६ ०२