१.
हो ! बोलणार आहे मी आज पावसावर
मी फार फार आहे, नाराज पावसावर
मातीत आज मुद्दल, कर्जात कास्तकारी
आकारणार कैसा मी व्याज पावसावर?
भाकीत सर्व खोटे, खोटीच वेधशाळा
आहे खरा कुणाचा अंदाज पावसावर?
फासावरी बळीचे मी प्रेत पाहिल्यावर
सांगा कसा करावा मी नाज पावसावर ?
ओला-सुका हमेशा, दुष्काळ पाहिला मी
मज वाटते खरोखर, ही लाज पावसावर
भेगाळल्या धरेवर उरले न प्रेम त्याला
इतका कसा चढावा तो माज पावसावर?
यंदा तरी पिको अन् ते कर्जही फिटो मग
चढवेन काळजाचा सरताज पावसावर
बेधुंद पावसाळा हृदयास मोहणारा
शब्दांमधून मोहक हा साज पावसावर
केलेस फार देऊ जे दुःख त्या बळीला
मी तेच पेश केले अल्फाज पावसावर
२.
जन्म-मृत्यूच्या मधे जो काळ असतो
यातनांचा त्यामधे बस जाळ असतो
शुद्ध तू चारित्र्य राहू दे कितीही
हीनतेचा पण तरीही आळ असतो
स्वच्छ पाणी ते जरी दिसतेय वरवर
पण तळाशी साचलेला गाळ असतो
भक्त का हमखास समजू मी तयाला
तो जरी हातात घेउन टाळ असतो
जर बिघडते काम त्याच्या बोलण्याने
वाटते की तो खरा वाचाळ असतो
दुर्जनांना जो शिव्या देतोय भरपुर
तू नको समजूस तो शिवराळ असतो
गाठले वार्धक्य आहे मी तरी पण
मायसाठी मी तिचा बस बाळ असतो
छप्पराची कोणत्या शोभेल उपमा ?
बाप म्हणजे आपले आभाळ असतो!
..................................................
