१.
मावळतीचे रंग मनावर धारण केले
त्यानंतर मी काळोखाचे औक्षण केले
काही केल्या मी म्हातारा होतच नव्हतो
मग स्वप्नांचे वय दुनियेला अर्पण केले
प्रलय संपला तेव्हा सगळे भांडत होते
विषय काय तर "कुणी कुणाचे रक्षण केले"
सगळेच गुन्हे समोरच्यांनी केले नव्हते
त्यांनी करण्याआधी काही आपण केले
माझ्या दुःखांना मी जेव्हा अनाथ केले
आप्तेष्टांनी त्यांचे पालनपोषण केले
त्या रोपांनी स्वप्न उद्याचे कसे बघावे
लाकुडतोड्यांनी जर वृक्षारोपण केले
शिवा कोरडा ओबडधोबड झाला आहे
या काळाने दगडाचेही घर्षण केले
२.
स्पर्श घेऊन गेलीस दुसऱ्याकडे
पण शहारा विसरलीस माझ्याकडे
व्याप असतो मला खूप माझाच पण
लक्ष असते तुझ्या बंद दाराकडे
आग लावू नका फक्त वणवा म्हणा
पेट घेतील काही खुळी लाकडे
वर्तमानात जर मी खटकलो तुला
माग स्पष्टीकरण भूतकाळाकडे
देव नसतो अशी बोंब ठोकायची
आणि त्यालाच घालायचे साकडे
या सुखांनो मला आत शोधा जरा
फक्त पाहू नका या ढिगार्याकडे
नग्न आत्मा कशाने लपवशिल शिवा
माप नसते कुणाचेच शिंप्याकडे
३.
ओंजळीतला ओला क्षण गहाळ झाल्यावर
शोध लागला पण तो भूतकाळ झाल्यावर
ओळखून आहे मी हा स्वभाव दुनियेचा
ती जहाल होणारच मी मवाळ झाल्यावर
गोष्ट कोणती आता सांगणार मेंढ्यांनो
एक लांडगा तुमचा मेंढपाळ झाल्यावर
लुसलुशीत गवताची हाव सोड आयुष्या
मागणी कशी पुरवू शुष्क माळ झाल्यावर
मायलेकराचे हे रूप वेगळे आहे
कान खेचते बुद्धी मन खट्याळ झाल्यावर
सांजवेळ फसवी अन् रात्र मतलबी असते
कोवळ्या उन्हासोबत ये सकाळ झाल्यावर
तू दिशा लपवशिल तर ढासळेल डोलारा
ध्रुव्व हो शिवाचे मन अंतराळ झाल्यावर
...................................................
