Showing posts with label किरण पिंपळशेंडे. Show all posts
Showing posts with label किरण पिंपळशेंडे. Show all posts

तीन गझला : किरण पिंपळशेंडे




१.


अशी का मीच माझ्याशी निराळी वागते आहे 

नकोशी वाट काटेरी तरीही मागते आहे 


बहाणे भेटण्याचे, सारखे स्वप्नात येण्याचे

कशाला चांदण्याची रात सारी जागते आहे


खरा खोटा न जाणे लोकशाहीची कहाणीही

जिथेही आज सत्याला मरावे लागते आहे


कितीही दान द्यावे ओंजळीने वासुदेवाला

तरी ना भूक त्याची ह्या युगाची भागते आहे


कितीदा आरशाने का भिजावे आसवांनी ह्या

तरीही मी तडा गेल्या मनाला डागते आहे


२.


शिंपला कोणी सडा हा चांदण्यांचा अंबरी

ओंजळीभर वेचुनी घ्यावा बघा कोणीतरी 


आठवावे का तुला मी काळवेळा पाळुनी 

सांजवेळी ओढ लागावी कशी ही अंतरी


कोणत्या रंगात रंगावे नव्याने आज मी

रंग तोची आठवांचा आसमंती केशरी


सागराची लाट होते वाहणारी नर्मदा 

पाहताना लोचनांनी भासते ती सुंदरी 


जीवनाची रोजवारी चालते मी आजही 

संकटाच्या का क्षणाला आठवावी पंढरी


३.


नकोस भेटू नकोस बोलू हरकत नाही 

कशी कळावी तुझी खुशाली समजत नाही 


दोघांनाही भाव मनाचे कळते सारे 

उगीच नाते कुणी कुणाशी जोडत नाही 


कशा कळेना जुनाट झाल्या काही गोष्टी 

पुन्हा नव्याने त्यांच्यातच मी हरवत नाही 


जरी शोधली हिरवळ माझ्या सभोवताली 

तरी कुणीही मनासारखे भेटत नाही


धूसर धूसर झाले सारे असे वाटते

हातावरची रेषा काही बोलत नाही


मनात नसता काहीबाही घडून जाते 

काय करावे तेही आता उमजत नाही


...................................................