१.
उगी हासण्याची सजावट कशाला
व्यथा झाकण्याची करामत कशाला
जिथे श्वास आहे तुझा गुंतलेला
तिथे जिवलगाशी अदावत कशाला
गजल छान व्हावी तुझ्या जीवनाची
चुकावी तिथे तू अलामत कशाला
समाजास आहे गरज बेरजेची
भल्या माणसाची वजावट कशाला
इथे कायद्याचे असे राज्य तर मग
दिसावी गरीबी सलामत कशाला
तुझे हासणे ही मळे चांदण्याचे
फुले भोवताली बनावट कशाला
जिवापाड माझी कळी राखली मी
तुला सोपवू ती अनामत कशाला
२.
मी माणसात आलो भीमा तुझ्यामुळे
मी मुक्त श्वास झालो भीमा तुझ्यामुळे
तू रोखल्या तुझ्या त्या बोटामुळे खरे
सूर्याकडे निघालो भीमा तुझ्यामुळे
जयभीम बोलल्यावर ऊर्जा मला मिळे
जयभीम मग म्हणालो भीमा तुझ्यामुळे
शिकलो तरी न टळला संघर्ष आमचा
संघटित आज झालो भीमा तुझ्यामुळे
पडलोत फार मागे बेकीमुळेच या
आता पुढे निघालो भीमा तुझ्यामुळे
अंधार दूर झाला हुंकारताच तू
आम्ही उजेड प्यालो भीमा तुझ्यामुळे
धम्मास गौतमाच्या स्वीकारता क्षणी
प्रज्ञेत मुक्त न्हालो भीमा तुझ्यामुळे
.................................
डॉ नंदकिशोर दामोधरे
अमरावती
मो.9890911263
