१.
पाण्यासोबत नांदत होत्या काही चिमण्या
पाण्यासाठी भांडत होत्या काही चिमण्या
त्या इवल्याशा चोचींमध्ये दाणा नाही
माणिकमोती सांडत होत्या काही चिमण्या
चिमणा-चिमणी भेद नसावा सारे म्हणती...
एकमेकीस सांगत होत्या, काही चिमण्या!
वास्तव, दुःखाच्या चटक्यांचे भानच नाही
नुसती स्वप्ने रांधत होत्या काही चिमण्या
रात्रीनंतर येतो दिनकर, या आशेवर
आकाशाला लांघत होत्या काही चिमण्या
फिरुनी लेकरु या खोप्यावर येणारच ते
या आशेने रांगत होत्या, काही चिमण्या
त्यांनाही वेळेची किंमत कळली बहुधा
मोर्चातूनी पांगत होत्या, काही चिमण्या
२.
नसे लोकशाहीत तोटाच येथे
भिकारी बने थेट राजाच येथे
जरी टाकतो जीव ओवाळुनी तो
तरी ठरवुनी घात त्याचाच येथे
लबाडा पुरस्कार मोठा मिळे अन्
ठरे योग्यता भूत-बाधाच येथे
गरीबी नसे पोर धन-दांडग्यांची..
हिच्या मंडपा पाल साधाच येथे
मला फार वाटे कि ज्ञानी बनावे
अहंकार हा मुख्य काटाच येथे
मला वेदनाही बिलगते अशी की
जणू कृष्णप्रेमात राधाच येथे
३.
सारेच सोबतीला पण एकटाच असतो
प्रत्येक वेदनेवर मग मनमुराद हसतो
रात्रीस झोप नाही, अस्वस्थता शिगेला
एकेक चेहरा का इतका मनात ठसतो?
प्रेमात माझिया तू आहेस काय दुःखा?
स्वप्नात मीच माझ्या हल्ली कुठेच नसतो
जाईल व्यर्थ जगणे ; कर्तव्य जाण जीवन
त्याच्या मुठीत दाणे, जो जो जमीन कसतो
जो सूर्य उगवतीचा, सत्कार कर तयाचा
अस्तास जो निघाला, स्थितप्रज्ञ होत असतो
सर्पासमान टाकी जो कात हरघडीला
भरताच पोट तोही हमखास यार डसतो
तो सत्य बोलणारा का घाबरे कुणाला?
लाव्ह्यासमान त्याचा कानात शब्द धसतो
...................................................
विनोद देवरकर,
उमरगा
मो. 9421355073