१.
जिथे भावनांचा विषय संपला
तिथे माणसांचा विषय संपला
दिली संकटांना अशी झुंज मी
करोडो भयांचा विषय संपला
नशा चाखली मी विरक्तीतली
विषयवासनांचा विषय संपला
अशी माणसे पाहिली भोवती
जणू श्वापदांचा विषय संपला!
तुझ्या जीवनाचे जुळव तू गणित
वजा-बेरजांचा विषय संपला!
बिया पेरल्या मी सुखाच्या मनी
कुठे पण तणांचा विषय संपला
२.
भरली नाही जखम जुनी ही नवा वेगळा घाव कशाला ?
जिथे आटला सागर आहे तिथे नदीची धाव कशाला ?
शेती,वाडा विकून त्याने फ्लॅट घेतला शहरामध्ये
स्थायिक झाला जर तिकडे मग आठवणींचे गाव कशाला ?
फिक्या खरोखर आईसमोर साऱ्या उपमा आणि उपाधी
'आई ' म्हणणे पुरेच आहे तिला वेगळे नाव कशाला ?
शुन्यामधली निर्विकारता चेहऱ्यावरी दिसते आहे
अंदाजाने कुणी घ्यायचा बंद मनाचा ठाव कशाला ?
सर्व सुखांच्या प्राप्तीसाठी जीवन खर्ची जाते अवघे
खेळ संपतो अर्ध्यावर मग संसाराचा डाव कशाला ?
दररोज जरी देव बदलतो पण येते का दैव बदलता?
मनात नाही भाव जरासा म्हणतो,देवा पाव कशाला ?
कर्तृत्वाने लिहितो आहे आजचा युवा अध्याय नवा
उत्क्रांतीचा बिगुल वाजता इतिहासाला भाव कशाला ?
३.
विरहात आठवांनी जेव्हा उठाव केला
डोळ्यांत आसवांनी मोठा तलाव केला
संघर्ष जीवनाचा सोपा कधीच नव्हता
पण आपल्या परीने आपण निभाव केला
स्वीकारले न खोटे आरोप लावल्यावर
राहून मौन मीही माझा बचाव केला
काढून केर सारा डोक्यातल्या स्मृतींचा
विसरायचा तुला मी थोडा सराव केला
टाकून पावलांना मागे फिरू कशाला?
चालायचे पुढे हा माझा स्वभाव केला
सत्यात भेटण्याचे साकारले कुठे मग
स्वप्नांत भेटण्याचा नंतर ठराव केला
कळतो कुठे हिरा अन् काचेतला फरक मग
खोटा जगापुढे जर त्याने बनाव केला