Showing posts with label पुष्पा दलाल. Show all posts
Showing posts with label पुष्पा दलाल. Show all posts

तीन गझला : पुष्पा दलाल

 



१.


कसे लिहावे समजत नाही  मित्रावरती

सोडत असतो हात मैत्रिचा अर्ध्यावरती


एक सावली विश्वासाची कृष्णसावळी

मी आहे ना, असे म्हणाली रस्त्यावरती


हाक देउनी थकल्यावरती आस हरपली

अलगद त्याने हात ठेवला खांद्यावरती 


ढेकळास मग विरायलाही अश्रू जेव्हा 

कारण ठरले हुंदक्यास मग गिळल्यावरती


मेंदूमधली एक गाठ जी सांगत असते

मित्रत्वाचा चष्मा वापर डोळ्यावरती 


भेद दावुनी प्रश्न उपस्थित चिडून करतो 

मित्र कशाला म्हणतो वेड्या  तोंडावरती


पाढे सारे लखलाभ तुला भल्या माणसा

हात जोडतो डावपेच मी शिकल्यावरती


वादळातली आर्त हाक ती कानी पडली

छप्पर उडले अहं पळाले वाऱ्यावरती 


२.


देतो धडे युगाचे मज लेकराप्रमाणे 

होतोय मार्गदाता शांती-दुताप्रमाणे


हळुवार मलमली तो स्पर्शात गोड हसला

घेता सुखावणारा चिमटा फुलाप्रमाणे


ते मोरपंख नामी देहावरून फिरले

वादळ शहारले बघ कैफातल्याप्रमाणे


झोळीत एवढी मग आवक मला न पटली

समजून वाटतो का चारा गुराप्रमाणे


फेकून चार आणे होणार काय त्याने?

अडवून चोप देते जनता मनाप्रमाणे


सारे शहर तुझे जर झिजला कुठे, कुठे तू?

कुदळीस खन्न झाले सिक्के-धनाप्रमाणे?


खोटारडेपणाचा इतिहास पाहिला तर 

थापाच ऐकल्या मी बस लांडग्याप्रमाणे


पदवीस पाहिल्यावर हृदयास कळ म्हणाली 

सांभाळ स्पंदनाला मग कालच्याप्रमाणे


३.


क्षणभर बघण्यासाठी मी पुरते ढासळले होते

तू हसला जेव्हा, सारे तारांगण सजले होते 


मधुगंधाचे ते पेरण मग तारण करण्यासाठी 

नजरेने बघता बघता अंतर्मन झरले होते


येवो परतीचे न्हाणे मखमलत्या तारुण्याचे

वळणालाही नक्की बघ स्वागत आवडले होते


गर्भालाही नात्याची पारख झालेली दिसते

वृंदावन आणिक तुळशी नाते ओळखले होते


श्यामल मेघाला आता कळ सोसत नाही कारण 

गिरकी घेता घेताना अल्लड कोसळले होते


तू गजरा माळत आली बघ अंबाड्याला जेव्हा 

हिरवे काकण लाजेने तेव्हा  किणकिणले होते

  

चंद्राला बघण्यासाठी ती उत्सुक आहे वेडी

जन्माचे सार्थक कसले,  तनमन हंबरले होते

...................................................