Showing posts with label अनिल काळे. Show all posts
Showing posts with label अनिल काळे. Show all posts

दोन गझला : अनिल काळे

 



१.

होते मनात जे ते घडणार आज बहुधा
दर्पण पुन्हा नव्याने हसणार आज बहुधा

ती जागणार आहे ही रात गारव्याची
चंद्रात गोडवाही असणार आज बहुधा

झाला खरा सुगंधी सारा शिवार आता
कमळात एक भुंगा फसणार आज बहुधा

घालून मान खाली केला तिने इशारा
तारा अनायसे तो तुटणार आज बहुधा

जड पापणीस झाली ही आसवे सुखाची
पाऊस सांजवेळी पडणार आज बहुधा

तळ सोडला लगोलग आले उठून मोती
ती सागरा-किनारी बसणार आज बहुधा

२.

थांब डोळ्यात तू काजळासारखा
केस शृंगारता मोगऱ्यासारखा

वात होऊन मी चल उभी पेटते
ये पतंगापरी सारखा-सारखा

मी बरसले कधीची तुझ्या अंगणी
तू उभा त्या तिथे चातकासारखा

ज्योत पेटेलही मेन वितळेलही
तू नको ना करू वादळासारखा

मी तुला अंगभर ओढते, माळते
फक्त कोरा रहा तू दवासारखा !

लाट होऊन मी चल तुला भेटते
तू किनारी रहा कातळासारखा

बाहुपाशात मी ऊब देते तुला
ये घरी एकदा गारव्यासारखा

वाट अंधारली चालते बेफिकिर
सोबतीला रहा काजव्यासारखा

वाच डोळ्यात तू, मी गिरवले किती
'अनिल ' नाहीस तू खोडण्यासारखा

.................................
अनिल पी .काळे
मु.पो .सिरसम (बु.)
ता. जि. हिंगोली
४३१ ५१३