Showing posts with label 'जगत मी आलो असा की ' : रवीन्द्र सोनवणे. Show all posts
Showing posts with label 'जगत मी आलो असा की ' : रवीन्द्र सोनवणे. Show all posts

'जगत मी आलो असा की ' : रवीन्द्र सोनवणे

 




जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही

एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही


जन्मभर अश्रूस माझ्या शिकविले नाना बहाणे

सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही


कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट  प्यालो

पण प्रकाशाला तरीही  हाय मी पटलोच नाही


सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी

एकदा हसलो जरासा पण पुन्हा हसलोच नाही


स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे

एवढे स्मरते मला की मी मला स्मरलोच नाही


वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले  तिऱ्हाइत

सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही


संपल्यावर खेळ माझा आंधळ्या कोशिंबिरीचा

लोक मज दिसले अचानक मी कुठे दिसलोच नाही


- सुरेश भट



कवी सुरेश भट यांची ही एक अप्रतिम गझल आहे. जिच्यात त्यांनी आपल्या असंख्य दुःखांना वाट करून देताना आपल्या मनातले शल्य सदर गझलेतून मांडले आहे. गझलेचा पहिला शेर बघूया


'जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही

एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही'


गझलेच्या पहिल्याच शेरात कविवर्य सांगत आहेत की मी आजवर जे आयुष्य जगलो ते स्वतःसाठी कधी जगलोच नाही. त्यामुळे असे वाटते की जगून सुद्धा मी जगलोच नाही. स्वतःच्या इच्छा,आकांक्षा, स्वप्न यांना मुरड घालून सदैव दुसऱ्यांच्याच स्वप्नांची, इच्छांची पूर्ती करत आलो. कधीकाळी मी ह्या जगाकडून काही, पण अगदी माफक अपेक्षा ठेवल्या होत्या; पण त्याही माझ्या पूर्ण होऊ  शकल्या नाहीत. ह्या जगाने मला असे तोडले की मग पुन्हा मी कधीच जुळू शकलो नाही. अशी खंत कवी सुरेश भट आपल्या पहिल्या शेरातून व्यक्त करतात.


'जन्मभर अश्रूस माझ्या शिकविले नाना बहाणे

सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही'


दुसरा शेर कवीच्या मनाचे दुःख मांडताना सांगतो की जीवनात खूपदा असे प्रसंग झेलले, असे दुःख वाट्याला आले की त्या दुःखात सुद्धा मला रडता आले नाही, अशीच काही अवस्था माझी झालेली होती की मी खुलेपणाने रडू सुद्धा शकलो नाही. माझे अश्रू सुद्धा माझ्या हक्काचे राहिले नव्हते. त्यांनी खूप प्रयत्न केला डोळ्यांमधून ओघळण्याचा, पण मीच त्यांना नेहमी आतल्या आत कोंडत गेलो आणि जगाच्या सुखासाठी कायम चेहऱ्यावर हसू आणून जगलो. पण तरीही कधी स्वतः खुश असल्याचे खोटे सोंग मला करता आले नाही.


'कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो

पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही'


तिसरा शेर  कवीच्या जीवनाचे आणखीन एक भयानक सत्य मांडून जातो. कवी म्हणतात की कितीदा तरी विजांचे घोट प्यायलो, अर्थात आयुष्यात अशा खूपशा विद्युलता भावल्या. ज्यांनी मला जाळून भस्म करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तरीही मी स्थितप्रज्ञ राहत ह्या विजांचे घोट पिऊन टाकले. एवढा दाह सोसला. पण तरी सुद्धा माझ्या जीवनातला काळोख कधीच संपला नाही आणि प्रकाशाला मी आवडलोच नाही. प्रकाश कधीच स्वतः होऊन माझ्या जीवनात आला नाही आणि जीवनातला हा कप्पा कायम अंधारातच राहिला.


'सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी

एकदा हसलो जरासा पण पुन्हा हसलोच नाही'


चौथा शेर कवी आपल्या जीवनात आलेल्या काही सुखद क्षणांबद्दल बोलत आहेत. कवी म्हणतात की जीवनात जेव्हा जेव्हा मी हसायचा प्रयत्न केला. जरासे सुख उपभोगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा ह्या क्रूर नियतीने माझे सर्व मनसुबे हाणून पाडले. हसण्याच्या क्षणाचे सुद्धा रडण्यात रूपांतर झाले. रडण्याचे हे हुंदके सांभाळता सांभाळता मन एवढे धास्तावले की मी इच्छा असूनही पुन्हा कधीच हसण्याचा प्रयत्न केला नाही. अशा क्रूरपणाने नियतीने कवीच्या जीवनाची चेष्टा केली.


'स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे

एवढे स्मरते मला की मी मला स्मरलोच नाही'


पाचव्या  शेरामध्ये कविवर्य सांगतात की माझ्या आयुष्याच्या व्यथा अगणित आहेत. कित्येकांचे चेहरे तर मला आठवत सुद्धा नाहीत. नेमकी कोणती व्यथा कुठे जन्माला आली आणि कोणती सल देऊन गेली हे सुद्धा मला नीटसे स्मरत नाही. अशा असंख्य अगणित व्यथांच्या राशी सभोवताली भरून उरल्या आहेत. ह्या व्यथांच्या गर्दीत मी स्वतःलाच  विसरून गेलो आहे. नक्की मी नेमका कोण आहे? माझ्या जन्माचे प्रयोजन काय? हेच मी विसरून गेलो आहे. स्वतःचाच शोध मला अजून लागला नाही.


'वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिऱ्हाइत

सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही'


सहाव्या शेरामध्ये कवी म्हणतात की खूप वेळा मला माझी स्वतःची सुखाची गाणी गुणगुणत जगावेसे वाटले. पण माझे ओठच जिथे मला दगा देऊन गेले तिथे मी माझी गाणी कुठून गाणार? ते सुद्धा फितूर झाले आणि दुसऱ्यांचेच गोडवे गात राहिले. शेवटी अशी वेळ आली की मी स्वतःचेच गीत स्वतःसाठी गाऊ शकलो नाही. अर्थात मला जे आवडले ते मला जीवनात कधीच करता आले नाही, ही खंत कवी ह्या शेरामधून मांडत आहेत.


'संपल्यावर खेळ माझा आंधळ्या कोशिंबिरीचा

लोक मज दिसले अचानक मी कुठे दिसलोच नाही'


सातवा शेर कवीच्या  जीवनाचे विदारक सत्य मांडतो. आंधळी कोशिंबीर खेळताना डोळ्यावर पट्टी असते आणि आपल्याला आपला भिडू टीपायचा असतो. अशा वेळी कवी म्हणतात की जेव्हा माझ्या जीवनातील जगण्याची धुंदी ओसरली होती, तेव्हा मला सारे लोक दिसत होते; पण त्यांच्यात मी मला कुठेच भेटलो नाही. अर्थात सर्वांच्या सोबत असूनही सर्वांच्यामध्ये मी नव्हतोच. माझे अस्तित्व लोकांमध्ये शून्य होते. सगळे जण आपापल्या ओळखीने आपापले चेहरे दाखवत होते. पण माझा चेहरा कोठेच मला दिसला  नाही. कुणाच्याच चेहऱ्यावर माझ्यासाठी ओळखीचे हसू दिसले नाही. अर्थात उभे आयुष्य  लोकांसाठी जगूनही माझे स्मरण कुणालाच झालेले दिसले नाही. जीवनाच्या अंतिम टप्प्यात मी मला एकटाच भेटलो.सर्व जण मला सोडून गेलेले मला दिसले. शेवटी ही दुनिया उगवत्याला नमस्कार करणारी आहे आणि मावळत्याकडे पाठ फिरवणारी आहे, हे मला जाणवले. हीच माझ्या जीवनाची खंत राहिली .


जीवनाचे विदारक सत्य मांडणारी ही कवी सुरेश भट साहेबांची गझल आपल्याला सुद्धा अंतर्मुख करून जाते.

....................................................