Showing posts with label जीव आंब्याची डहाळी होत जातो : श्रीकृष्ण राऊत. Show all posts
Showing posts with label जीव आंब्याची डहाळी होत जातो : श्रीकृष्ण राऊत. Show all posts

जीव आंब्याची डहाळी होत जातो : श्रीकृष्ण राऊत




२०१० च्या थोडंसं मागेपुढे

गझल लिहू लागलेल्या, नव्या पिढीच्या युवा गझलकारांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, म्हणून शाहीर सुरेशकुमार वैराळकरांनी पुण्याला २९ एप्रिल २०१२ ला 'सुरेश भट गझल मंच'ची स्थापना केली. ह्या मंचाने अनेक तरुण गझलकारांना प्रकाशझोतात आणले.

ह्या नव्या दमाच्या गझलकारांना मनःपूर्वक लेखी दाद देता येईल, त्यांचे कौतुक करता येईल; ह्या उद्देशाने दै. 'सामना'च्या संपादकांनी दिलेला सदर लेखनाचा प्रस्ताव मी स्वीकारला. २०१५ साली वर्षभर दै. 'सामना'च्या 'फुलोरा' पुरवणीत, दर शनिवारी, नव्या गझलकारांच्या प्रत्येकी तीन निवडक शेरांवर आस्वादात्मक भाष्य करणारी 'गझलाई' ही छोटेखानी लेखमाला मी लिहित होतो. त्या लेखमालेत दि.२८ मार्च २०१५ ला सतीश दराडेवर प्रसिद्ध झालेला लेख, आज २०२४ मध्ये अत्यंत जड अंतःकरणाने श्रद्धांजलीपर येथे पुन्हा उद्धृत केला आहे.

....................................................


आज राम नवमी. इकडे गावात, शहरात, मंदिरात रामजन्माच्या उत्सवाचा आनंद उत्साहाने उचंबळतोय. तिकडे सृष्टीला वसंताची चाहूल लागली. 'ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनियाँ' म्हणत बालपावलांच्या गतीनं उन्हाची हळद हळूहळू गडद होऊ लागली आहे.अवकाळी पावसानं, गारपिटीनं आंब्याच्या मोहोराची माती झाली. पण निसर्गचक्राला थांबणं ठाऊक नाही. त्या आंब्याच्या डहाळीवर कोकिळ येऊन बसेल. आपल्या प्रियेला आर्त साद घालेल 'कुहू कुहू'! नर कोकिळाच्या काळ्या तपकरी पंखांवर ठिपक्या ठिपक्यांची सुरेख रांगोळी प्रकृतीनं रेखाटली. हजारो वर्षांपासून तो नर पंचमस्वरात  प्रेमगीत आळवतोय. प्रियेचा पुकारा करतोय. तो मधाळ स्वर कानातून थेट आपल्या हृदयात उतरतो. शांत जलाशयात खडा टाकतो. अगणित तरंग उमटवतो. त्यातलं एक वलय सतीश दराडेंच्या शेरात ध्वनीत होतं -


'जीव आंब्याची डहाळी होत जातो

काय गाते कोकिळा माहीत नाही'


'जीव आंब्याची डहाळी होणे' ही प्रतिमा संवेदनशील मनाला जाणवण्याची गोष्ट आहे. तिच्या प्रतीत होण्याचं विश्लेषण शब्दांत करता येणं अशक्य. ते तुम्हाला केवळ 'फिल' करता येईल. महसूस करता येईल. गझलच्या शेरातल्या-कवितेतल्या अशा प्रतिमा समजावून सांगताना तुम्हाला दुसरी कविताच लिहावी लागते. तरी ते संपूर्ण व्यक्त होईल असे वाटत नाही आणि ह्या एकमेव कारणामुळेच तर आपण एखाद्या 'प्रिय' खिडकीजवळ रेंगाळावे तसे त्या ओळींपाशी वारंवार घुटमळतो. नराऐवजी मादी कोकिळा गात असल्याचा काव्यसंकेत कालचक्रात केव्हातरी रूढ झाला. आजतागायत तो कवींना खुणावत आलेला आहे.


वसंताला घेऊन येणारा आणखी असाच एक भावतरल शेर सतीशच्या गझलेत जीवनाचा उत्सव साजरा करताना भेटतो -


'दे एकदा वसंता हाती प्रभार माझ्या

वाटे फुलाफुलांवर मी स्वाक्षऱ्या कराव्या'


खरं तर 'प्रभार' हा कार्यालयीन कामकाजातला रूक्ष शब्द.पण त्याचे सोयर 'स्वाक्षऱ्या' शब्दाशी जुळल्यावर कसा काव्यात्म होतो; याची उत्कट प्रचिती वाचकाला यावी आणि पुन्हा एकदा 'फुलाफुलांवर स्वाक्षऱ्या करण्या'ची प्रतिमा आपण निखळपणे तीव्र जाणिवेने अनुभवावी.


प्रत्येकवेळी आपल्याला पाहिजे तसे पत्ते पडतातच असे नाही. कधी कधी वसंताच्या सांगाव्यातून 'नकार' ही येतो. येऊद्या! आपण आपली जिद्द सोडायची नाही. काही झालं तरी हार मानायची नाही -


'वसंताच्या नकाराचे जरी येतात सांगावे

तरी खडकावरी आम्ही फुलांची कोरतो नावे'


'खडकावर फुलांची नावं कोरणारी' ही जिद्द 'ओल्ड मॅन अँड द सी' मधल्या म्हाताऱ्याची चिरतरुण उमेद आहे.

सतीशला त्याचा स्वतःचा 'वसंत' सापडला आहे.


१४ एप्रिल २०१४ ला

यू आर एल फौंडेशनचा

'गझल गौरव ' पुरस्कार सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते ज्येष्ठ गझलकार म्हणून

मला मिळाला होता. याच सोहळ्यात  'श्वासांच्या समीधा' हा सतीशचा गझलसंग्रह उदयदादा लाड ह्यांनी प्रकाशित केला आणि युवा गझलकार म्हणून त्याला 'गझल उन्मेष' पुरस्कारही दिला. 


सतीश मूळ मराठवाड्यातला. 'मास्तरकी' करण्यासाठी वऱ्हाडात आला. इथे त्याची गझल उमलली. बहरली. आता त्याची गझल प्रादेशिकतेचे सीमोल्लंघन करून अवघ्या महाराष्ट्राची झाली.


(नांदेडच्या सूर्यमुद्रा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'गझलाई' ह्या आस्वादात्मक समीक्षा ग्रंथामधून )

...................................................