१.
एक पात्र का केवळ आपण नाटकातले
नावही स्वतः ठेवत नाही पाळण्यातले
कोणी हत्ती, कोणी हरिणी, कुणी लांडगा
प्राणी आपण परिस्थितीच्या पिंजऱ्यातले
शाळेमध्ये खिचडीसाठी रांग केवढी
दाताखाली खडेच आले तांदळातले
कुणी विदूषक हसवत असतो जगास नेहमी
दुःख कुणाला दिसेल त्याच्या काळजातले
बाबासोबत मुलगा सुद्धा भाजी विकतो
भाजीसोबत दप्तर दिसते कोपऱ्यातले
कट्टी दोस्ती राग चिमुकला बालपणीचा
लटके रुसणे छोट्या छोट्या भांडणातले
वैशाखाच्या होरपळीने जगता जगता
मनात जपले सारे क्षणक्षण श्रावणातले
२.
दुर्दैवाशी दोन हातही करता यावे
आयुष्याला उत्सव म्हणुनी जगता यावे
हातामधुनी निसटत जातो आहे क्षणक्षण
सरणाऱ्या या क्षणात थोडे उरता यावे
परिपूर्तीचा ध्यास असावा, मान्य! परंतू
अपूर्णतेने सुद्धा थोडे झुरता यावे
माझे माझे म्हणून ओझे घेउन जगतो
सोडुन ओझे कधीतरी पण फिरता यावे
चंचल इतके मन पाऱ्याचे कसे थोपवू?
त्याला माझ्या ताब्यामध्ये करता यावे
घडता काही वाइट आपण सोडुन द्यावे
फक्त चांगल्या क्षणास कायम स्मरता यावे
क्षणात ज्यांच्या जगण्याचाही दरवळ होतो
फुलापासुनी मला एवढे शिकता यावे
३.
नात्यांमध्ये जेव्हा घडते काहीबाही
खूप खोलवर तेव्हा तुटते काहीबाही
मौनामधले गुपित सांगते काहीबाही
प्रेमामध्ये नजर बोलते काहीबाही
सोबत असतो तेंव्हा काही वाटत नाही
तुझ्यावाचुनी इतके अडते काहीबाही
संवादाची वेळ संपते चुटकीसरशी
बोलायाचे तरी राहते काहीबाही
संपविल्याने संपत नसते कधीच नाते
वेदनेतही मागे उरते काहीबाही
किती लाजली आरशात ती बघता बघता
स्मरल्यावरती उगाच छळते काहीबाही
शब्द विषारी समजत नाही बोलत जातो
दोघांमधले खरेच मरते काहीबाही
...................................................