१.
ही रात्र चांदण्याची सजली तुझ्याचसाठी
हृदयातली व्यथाही हसली तुझ्याचसाठी
वारा सुगंध वाटत वाटेस बोलला अन्
बागेतली चमेली रुसली तुझ्याचसाठी
हळुवार घाल फुंकर होईल स्वप्न जागे
स्वप्नास गोड व्याधी जडली तुझ्याचसाठी
देऊ नकोस अंतर मन बोलले मनाशी
निक्षून पापणीही भिजली तुझ्याचसाठी
विरहार्त विरहिणी मी आतूर भेटण्याला
कळ वेदनेत हलकी उठली तुझ्याचसाठी
इतकेच मागणे की स्वीकार प्रेम व्हावे
आशेत रिक्त ओंजळ भरली तुझ्याचसाठी
ओठांवरी फुलांच्या नाजूक गोड नक्षी
गालावरी सजाया फुलली तुझ्याचसाठी
माझ्या-तुझ्या प्रितीचा बहरेल रंग आता
दोघांत पत्रिकाही जुळली तुझ्याचसाठी
निस्सीम प्रेम माझे गझलेत मांडले मी
करशील का मुकर्रर रचली तुझ्याचसाठी
२.
गोष्ट केवळ आपल्या दोघात आहे
नेमकी जागा तुझी हृदयात आहे
मोगरा गंधाळला श्वासात माझ्या
केवढी जादू तुझ्या हातात आहे
आरसा सांगून गेला पाहताना
रूप हे तर लाजले प्रेमात आहे
जीव जडतो का कुणावर कोण जाणे
कृष्ण-राधेच्या मनाला ज्ञात आहे
तेवताना ज्योत प्राणाच्या दिव्याची
शुद्ध भावाने भिजवली वात आहे
मुक्तता नाही कुठेही बांधल्यावर
एवढी ताकद तुझ्या श्वासात आहे
रोज करते प्रार्थना परमेश्वराला
नाव त्याचे नेहमी ओठात आहे
३.
कधी बोजड मनाचा कर उतारा
जरा थांबव विचारांचा पसारा
तुझ्या माझ्यातल्या वादास मिटवू
कधी भडकू नये त्याचा निखारा
तणावाचे खुजे दडपण निरर्थक
किती होतो मनाचा कोंडमारा
सुखाचे दार ठोठावून आले
तुझा दुःखा तरी करते पुकारा
नकोशी जन्मतः हेटाळली ती
तिला कळणार मायेचा उबारा?
अढळ स्थानी सदा दिसतोय तेथे
मनाला मोहणारा एक तारा
जरी असतात लाटा फार अवखळ
निरंतर साथ देतो पण किनारा
...................................................
सौ.सोनल मनोज गादेवार
यवतमाळ
