Showing posts with label अशोक वाडकर. Show all posts
Showing posts with label अशोक वाडकर. Show all posts

दोन गझला : अशोक वाडकर

 



१.


पांगळ्याने वेंधळ्याचे सोंग घ्यावे

वेंधळ्याने पांगळ्याचे सोंग घ्यावे


या इथे रुजते बियाणे आंधळ्याचे

डोळसाने आंधळ्याचे सोंग घ्यावे


भेकडांची फौज आली रोज येथे

बोकडाने  भेकडाचे  सोंग  घ्यावे


लोचटांचा रोज नंगानाच चाले

पोचटाने लोचटाचे सोंग घ्यावे


गर्दभांचा नित्य झाला वास येथे

वाघराने  गर्दभाचे  सोंग  घ्यावे


नाटकाचा रंगलेला थाट भारी

माणसाने श्वापदाचे सोंग घ्यावे


२.


एक गोष्ट ती जुनीपुराणी छळते आहे

चित्त बिचारे तिच्याभोवती पळते आहे


पीठ आयते पडते, कुत्रे खाते आहे

आंधळे इथे निमुटपणाने दळते आहे


जीवनातले  सावट  सदैव  नैराश्येचे

दिवसारात्री क्षणाक्षणाला पिळते आहे


महागाइचे वादळ भवती भिरभिरणारे

जीवननिष्ठा कणाकणाने ढळते आहे


नित्य बरसती गाजरधारा अटीतटीने

भ्रष्ट व्यवस्था भोजन सारे गिळते आहे


परंपरा अन् रुढी आजच्या बदलत जाती

नव्या प्रथांचे रिंगण पुरते रुळते आहे


.................................................. 

अशोक म. वाडकर,

कोल्हापूर