१.
गळले होते बरेच अश्रू असली नकली
क्रिया वेगळी नसूनसुद्धा ...खोट समजली
डोंगरमाथा होत चालला खुजा अताशा
कमी जाहली दरी म्हणूनच लोकांमधली
गंभीरपणे बोलत होत्या तिथे मैत्रिणी
दुःख जरासे निवळायाला गंमत सुचली
शांत,संयमी भाषण जो तो ऐकत होता
जीभ घसरली सभेत तेव्हा खसखस पिकली
टिकवत होती कपाळावरी परंपरा ती
नावावरती सोयीच्या पण टिकली ; टिकली
फळा पाहुनी जसेच्या तसे ती उतरवते
वही स्वतःचे लिहावयाला कोठे शिकली
त्या लोकांनी द्रव्य कमवले तऱ्हेतऱ्हेने
वाढत गेली फार तफावत म्हणून इथली
२.
जशीच्या तशी तू फिरवली गझल
पुराव्यात माझी अडकली गझल
मरत चालली ती सुखांना बघुन
व्यथा वेदनांनी जगवली गझल
दगा पावसाने दिला नेहमी
तरी आसवांनी भिजवली गझल
उधळलीत कौतुक-फुले तू किती
तुझ्या गोड बोलीत फसली गझल
फुफाट्यात जेव्हा तिला लोटले
स्वतःहून पेटून उठली गझल
मनाची अवस्था जशी आजची
तशी काळजावर उमटली गझल
पटावर जरी सुख तिच्या नोंदले
व्यथेने तिला तर शिकवली गझल
३.
फुकटात पाळलेली नागीण आतली
सांभाळते हवेली नागीण आतली
मैत्री तुझी नि माझी सरली जवळ जवळ
मारून डंख गेली नागीण आतली
पिंडीवरी शिवासह अभिषेक झेलते
आहे तहानलेली नागीण आतली
प्रस्ताव अमृताचा केला तिच्यापुढे
माझ्यामुळेच मेली नागीण आतली
टाकून कात होते ती आणखी चपळ
पळते जशी नवेली नागीण आतली
तत्पर सदैव असते ती सूड घ्यायला
असते पिसाळलेली नागीण आतली
व्हावी अजून जहरी... फुत्कार दूरवर,
दहशत कमावलेली,नागीण आतली.
.................................
स्मिता गोरंटीवार वणी जि. यवतमाळ
9850079959