१.
डोक्यावरती मिरे वाटतिल असे वाटले नव्हते
मित्रच माझे श्रेय लाटतिल असे वाटले नव्हते
घेत उभारी माझ्यापासुन उंच गाठली शिखरे
नंतर माझे पंख छाटतिल असे वाटले नव्हते
ठाऊक होते, रोटी-बेटी व्यवहाराला बंदी
स्पर्शाने नुसत्याच बाटतिल असे वाटले नव्हते
ताट आणखी पाटही दिला वेळोवेळी ज्यांना
पत्ता माझा तेच काटतिल
असे वाटले नव्हते
गद्दारी माझ्याशी केली हरकत नव्हती माझी
शत्रूंचे ते पाय चाटतिल असे वाटले नव्हते
मी गेल्याने ओले झाले आप्तेष्टांचे डोळे
परक्यांचेही कंठ दाटतिल असे वाटले नव्हते
माणुसकीला महाग झाली जरी माणसे हल्ली
हृदयामधले झरे आटतिल असे वाटले नव्हते
२.
खेळ नियतीचेच उलटे रम्य वाटू लागले
अन् सुखांशी केवढे वैषम्य वाटू लागले!
जन्मभर समजू न शकलो माय-बापाची व्यथा
सर्व ते अपराध मज अक्षम्य वाटू लागले
काय बोलावे तुझ्या मौनावरी आता सखे?
वागण्याचे ते तुझ्या तार्तम्य वाटू लागले
एवढी शक्ती कुठे होती तुझ्या प्रेमामधे?
भेटणे जन्मात का दुर्दम्य वाटू लागले?
तू नको दावू मला नसत्या सुखाची आमिषे
सोहळे दुःखातले अनुपम्य वाटू लागले
३.
जन्मभर छळले तरीही धन्य होते
सोयऱ्यांचे एवढे सौजन्य होते!
आळ मी घेऊ कसा कोणावरीही?
घात करणारे कुणी का अन्य होते?
मानवी संवेदना होत्याच कोठे?
भोवती प्राणीच बहुधा वन्य होते
हे कलेवर कोण चालवते कळेना!
कोणते अज्ञातसे चैतन्य होते?
हे उभे आयुष्य माझे राख झाले!
काय त्यांचे प्रेम अग्नी-जन्य होते?
पोट भरण्या धावले शहराकडे गाव मागे राहिले निर्जन्य होते
करपली शेते तरीही थेंब नाही
का कुणी हे रोखले पर्जन्य होते?
....................................................
