१.
वाटे जसे जयाला,त्याने तसे जगावे
कोणी नभास ल्यावे,कोणा ठसे दिसावे
माझ्या जिण्यास केवळ माझीच साक्ष पुरते
तुमच्या मताप्रमाणे मी का कधी झुकावे?
लावून अर्थ खोटे हे मोजमाप कसले ?
तुमच्याच या मताने मी का मला तुलावे ?
मी राजरोस गेले चालून राजरस्ता
म्हणता तुम्ही म्हणोनी मी का मधे वळावे ?
केली तमा न कसली या जीवनात मीही
झगडून येथ आले,कोणास का खुपावे ?
प्रत्येक जीवनाचा तो वेगळा तराजू
जगण्यावरी कुणाच्या आक्षेप का असावे ?
'क्षितिजा ' तुलाच ठावे आयुष्य काय होते!
स्मर जे तुझेच आहे बाकी विरून जावे.
२.
गुरुभेटीची ओढ लागली मनास माझ्या
माहेराने साद घातली मनास माझ्या
समीप तुझिया फक्त बसावे मिटून डोळे
आस जराशी असे आगळी मनास माझ्या
व्यापताप अन् ताण मनाचे विरून जाती
भक्तीनेही साद घातली मनास माझ्या
कसा बुलावा येतो कानी आपसूक हा
भेटीसाठी त्वरा जाहली मनास माझ्या
तुझिया भाळी लिहिली 'क्षितिजा ' आशीर्वचने
शांतविते ही मायमाउली मनास माझ्या
३.
माणसाचा घात केला माणसाने
वैरही वाट्यास आले वारशाने
दाविली नाहीच रूपे जी खरी ती
नेहमी अन्याय केला आरशाने
हा ससाही नेहमी जिंकेल का हो?
मात केली त्यावरीही कासवाने
आसवे रोखून होती ठेवलेली
केवढी केली कृपा त्या पावसाने!
केवढी 'क्षितिजा ' उपेक्षा या जिवाची ?
मरणतरि यावे जरा आता सुखाने!
.................................
मीनल बाठे.
'क्षितिजा '