१.
बोलते खोटे खर्याला आणि बघते दामटू
लागती तेव्हा खऱ्याचे पाय येथे लटपटू
सोडले आहे मला तू लग्न झालेही तुझे
मी कशाला पण तुझा संसार आता विस्कटू
बोललो होतो खरे मी ते तुम्हाला झोंबले
वाटले होते तुम्हाला सत्य तेव्हाही कटू
न्याय मागितला असे मी आज त्या न्यायालयी
मीच माझी सत्य बाजू मांडली, का पालटू?
खेचती ते पाय माझे मी पुढे जाता जरा
वाटते आहे जणू निष्णात ते कबडीपटू
२.
नाहीच माहिती की घडणार काय आहे
पुढच्या क्षणास येथे दिसणार काय आहे
कोणी विचारतो का जगता तुम्ही कसे हे
तुमच्याशिवाय त्यांचे अडणार काय आहे
येथे कमावले मी म्हणता तुम्ही सदैवच
जाता निघून आपण उरणार काय आहे
चिंता नको उद्याची आता जगून घ्यावे
केला विचार तरिही कळणार काय आहे
साठा करून असता मारून मन स्वतःचे
पण शेवटास सोबत असणार काय आहे
नटली वसुंधरा ही सृष्टी पहा जरा ही
मिटले उद्याच डोळे बघणार काय आहे
३.
सत्तेचा हव्यास नको
खुर्चीची ती आस नको
शेतकऱ्याला मदत हवी
तुमची ती बकवास नको
'तू तू मै मै ' ही तुमची
कटकटही आम्हास नको
न्यून नसे आम्हा काही
रोजचाच पण त्रास नको
वरवरचा हा देखावा
तो आम्हा तूर्तास नको
ठोस असे ते काम हवे
वचनांची आरास नको
.................................
डी.एम.कांबळी,
9987193338
