जमाना सतत बदलत असतो. आजकाल पोराला नव्वद किंवा शंभर मार्क मिळावेत, असे प्रत्येक बापाला वाटत असते. जीवघेणी आज स्पर्धा. कोण तो लाचार आहे अशी स्थिती सद्यस्थितीत सर्वांची झाली आहे. एखाद्याच्या लेकराला शंभर टक्के मार्क मिळूनही पालक असमाधानीच असतात. पूर्वीच्या काळी पास झाले (म्हणजे ३५ टक्के गुण मिळवले) तरी समाधानच असे. गावातून पालक साखर वाटायचे. आणखी एक म्हण ते वापरतात
गाव सारा भावकीचा एक कामाचा दिसेना
आणिबाणी लागल्यागत ठेवती सारेच अंतर
सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अशी म्हण आहे. गावातील सारेजण मानतात ; परंतु वेळ आल्यावर कुणीच कामाला येत नाही. तर लांब लांब जातात. अंतर राखून बोलतात. माणसांचा तो स्वभाव आहे, असे यशंवंत म्हस्के म्हणतात.
'मी कातळ काठावरचा' हा यशवंत म्हस्के यांचा गझलसंग्रह आहे. आपल्या गझलेचे श्रेय आपली पत्नी तृप्ती, मुले स्वरा आणि संयम तसेच जन्मदाते आईवडिलांना ते देतात. कृतज्ञता त्यांच्या ठायी आहे. आपल्याला हे जग कसे आहे हे स्वप्नातून जागे झाल्यावरच कळते. भाकरीची चव कधी कळते तर ते म्हणतात -
'कळाली भाकरीची चव मला आता
तव्यावर हात माझे भाजल्यानंतर'
पूर्वी लोक म्हणत की आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हा सर्वमान्य सिध्दांत ते सांगतात.
माझ्या व्यथेची कथा तू ऐक मग तुला माझे दुःख कळेल, असे ते सांगतात.
'फुटे ऐकून पाझर कातळालाही
कथा माझ्या व्यथेची मांडल्यानंतर'
जीवनात कष्ट आणि दुःख हे सगे-सोयरे इतके घट्ट आहेत, की माझ्या व्यथेची कर्मकहाणी ऐकून पत्थरालाही पाझर फुटेल.
मला मलई नको माझी कष्टाची भाकरी तू मला दे असे ते विठ्ठलाला म्हणतात -
'कधी मी म्हणालो मला दे मलाई
हवी भाकरी ती भुकेला विठाई'
प्रत्येकाला वाटते दुसऱ्याच्या पोटी शिवाजी जन्मावा आणि आपल्यावरच्या अत्याचाराचा बदला त्याने घ्यावा
ते म्हणतात -
'जरी जन्म घ्यावा शिवानेच वाटे
तरी का कुणातच दिसेना जिजाई'
भारतीय संविधानावर त्यांची खूप श्रद्धा आहे. ते सांगतात -
'काव्य खूप वाचलेस ग्रंथ खास वाच तू
भारतीय संविधान वाच एकदाच तू'
तू खूप कविता वाचल्यास, अनेक ग्रंथ वाचलेस; परंतु माणुसकी शिकवणारा आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा ग्रंथ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान एकदा तरी वाच, त्याचा अर्थ समजावून घेऊन तू आपले वर्तन करावे, असे ते वाचकांना सांगतात.
आपण खूप म्हणतो की मला खूप वेदना सोसाव्या लागल्या परंतु यशवंत म्हणतात, ती वेदनाच मला सोसते
'छान शिकलो अशी मी कला
सोसते वेदना ही मला'
वेदनेने आपल्याला सोसावे, आपले चोचले पुरवावेत, ही गोष्ट सामान्य नाही. ती यशवंतांनाच जमते. आपण प्रीतीला खूप जपतो; परंतु ती आज मला बला वाटते.
सैनिकाची जीवनगाथा शब्दबद्ध करताना एका गझलेत ते म्हणतात -
'असे रक्तास ओला गंध माझ्या मातृभूमीचा
पुरावा काय देऊ मी तुम्हाला देशभक्तीचा'
भारतीय सीमेवर आपले रक्त सांडणारा जवानच खरा देशभक्त. इतरांची देशभक्ती टाकाऊ असते, असे सत्य ते सांगतात.
शेतकरी उन्हाळ्यात आपली शेती कसतो. मशागत करतो. नांगरट करतो. कारण त्याला आशा असते पीक येण्याची. अशी त्याची वृत्ती असते.
'जमीन कसली उन्हात साऱ्या
पिकेल यंदा बरी म्हणालो'
हा शेतकरी आशावादी आहे. तो निसर्गाला नावे ठेवत नाही.
घरात छदाम नाही तरी मी सुखी आहे.
'छदाम नाही घरी म्हणालो
मजेत आहे तरी म्हणालो'
मी मनाचा श्रीमंत आहे. सुखी समाधानी आहे. घरी काही पैसा अडका नाही, तरी मी मनाने खूप धनवान आहे. ते दुःखाशी मैत्री करतात. जग सारे सुखाचे भोक्ते, तरी ते दुःखाला कवटाळतात.
'कितीदा एकट्याने पोसले त्याला
तुझेही दुःख बनले लेकरू आता'
असे ते म्हणतात. दुःखाला लेकरू म्हणतात. त्याची बडदास्त ठेवतात. या संग्रहातील शीर्षकाची गझल सर्वांवर वरचढ आहे. नदीला स्वैरपणे व स्वच्छंदीपणे वाहता येते. पण काठावरच्या कातळाला (पत्थराला) हालता येत नाही. वाहता येत नाही.
शिक्षकी पेशात असल्याने म्हणींचा स्वैर वापर त्यांनी केला आहे. रसिक वाचकांतील मूल ते जपतात. वाचकांना विचार करायला प्रवृत्त करतात.
'सुदर्शन बारापात्रे' यांचे मुखपृष्ठ वेधक आहे. काठावरच्या कातळाचे हे चित्र आतील गझलांचा वेध घ्यावा असे सुचवते.
....................................................
'मी कातळ काठावरचा',
(गझलसंग्रह)
-- यशवंत म्हस्के
पृष्ठे १०७, मूल्य १६० रुपये
गझल मंथन प्रकाशन,
कोरपना, जि. चंद्रपूर
....................................................
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
९०११०८२२९९
