Showing posts with label हेमंत पुणेकर. Show all posts
Showing posts with label हेमंत पुणेकर. Show all posts

लवचिक वृत्तातील गझल : हेमंत पुणेकर

 




खूप जिवाचे[1] रान झाले 

मग जरासे भान झाले 


मी किती अज्ञानी* आहे  

एवढे तर ज्ञान झाले! 


शत्रु पण तारीफ करतो 

हे खरे सन्मान झाले 


शांत झाली ती अचानक

मग पुढे थैमान झाले 


तोंड फुटले निंदकांना 

बहिरे* आम्चे[2] कान झाले 


चुकले* पण झुकल्या न माना 

लोक असे[3] बेमान झाले! 


ती गझल ऐकुन म्हणाली 

शेर काही छान झाले


वृत्त:  गालगागा गालगागा 


तळटीप:-

1. 'खूप ' असे लिहिले जाते पण उच्चार मात्र 'खूप् ' असाच केला जातो. या अर्ध्या प् ची मात्रा पुढच्या शब्द 'जिवाचे ' च्या 'जि' शी जोडून 'खूप्जिवाचे ' असा उच्चार केल्यास गालगागा अशा वजनात उच्चारता

येतो.

* उर्दूच्या छंदशास्त्रानुसार 

शब्दाच्या शेवटचे अक्षर गुरु असेल तरी त्याची मात्रा घटवून 'लघु ' करता येते.

त्यानुसार

अज्ञानी = गागाल

बहिरे= गाल

चुकले = गाल

अशी लगावली होते.


2. 'आमचे ' लिहिले जाते पण उच्चार 'आम्चे ' असा होतो म्हणून गालगा आणि गागा दोन्ही वजन घेणे शक्य आहे. 'अमुचे ' सारखा शब्द लिहिता आला असता पण तो टाळला आहे. जे बोलण्यात नाही ते फक्त वजन सांभाळायला म्हणून का घ्यावे?

3. उर्दू छंदशास्त्रानुसार नंतर येणाऱ्या शब्दाचा प्रारंभ स्वरांनी सुरु होत असेल तर आधीच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरासोबत त्याची स्वरसंधी होऊन स्वरांचा एकत्र उच्चार होतो.

लोक असे = लोक् + असे = उच्चार 'लोकसे ' = गालगा