दिसणाऱ्या दृश्याने मनात विचार येतात का? पूर्वी उत्तर 'हो' होतं. आता मात्र 'असं होतंच, म्हणजे विचार येतातच असे नाही' कारण एकाचवेळी तुम्हाला बरंच काही दिसत असतं,मात्र परिणाम करणाऱ्या दृश्याने विचारांना सुरुवात होऊ शकते.
असं पहा,आपल्या भोवती, समोर, मागे, पुढे,वर, खाली , आजूबाजूला , सर्व ठिकाणी काही ना काही आहे. त्यातही मानवी डोळ्यांच्या समोर एक कोन, अक्षरशः 'आईस्क्रीम कोन' सारखा तयार झालेला असतो (यामुळे 'दृष्टिकोन' शब्द तयार झाला असावा, तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.) तर प्रत्येकाचा हा कोन कमी अधिक असतो. पर्स्पेक्टिव्ह ड्रॉईंगसाठी (यथार्थ चित्रासाठी) साधारणपणे ६०अंश ते ९० अंशाच्या आवाक्यात येणाऱ्या गोष्टी स्पष्ट असतात, त्यांनंतर गोष्टी तर दिसतात पण धूसर दिसतात. १८०° म्हणजे सरळ रेषा, आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूला, दोन्ही हात सरळ फैलावल्यास होणाऱ्या सरळ रेषेपेक्षाही १० ते १५अंश जास्तच (मान न हलवता) आपल्याला जाणवत असते. म्हणूनच बरेचदा, मागून होणाऱ्या हालचालींची जाणीव आपल्याला होते.
'दिसणं' हे अनेक प्रकारचे असू शकतं. प्रत्यक्ष घडत असलेल्या घटना, नकळत होणाऱ्या घटना, अचानक घडणाऱ्या घटना, आपण तेथे हजर असल्यास त्या दिसतात. काही आपण निवडलेल्या असतात. चित्रपट, मोबाईल, टीव्ही, कम्प्यूटर, आयपॅड इ. आपण निवडलेल्या असतात, त्यातही (तुम्ही हे पहावंच, अशा उद्देशाने) अनेक दृश्ये 'घुसवलेली' असतात. ती नाही म्हटली तरी दिसतातच.बंद डोळ्यांनी दिसणारी अनेक दृश्ये आहेत. त्यांना स्वप्न असं गोंडस नाव आहे. तुम्हाला आवडो न आवडो ती दिसतात. कधी कधी ज्याचा जास्त विचार होतो ते स्वप्नात दिसते असं म्हणतात, पण स्वप्नांचं काही खरं नसतं ! महत्त्वाकांक्षी माणसांची स्वप्ने वेगळीच असतात. त्यांना जे दिसतं त्या दिशेने ते कधी कधी आयुष्यभर प्रवास करत राहतात.
साधं उदाहरण घ्या. अक्षरांच्या समुहातून सुद्धा दृश्य दिसायला सुरुवात होते, छोटे छोटे शब्द असतात. अतिशय परिणामकारी, मग त्यांच्या वाक्यांनी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनांनी तर 'बहार' येते. 'उच्छाद' मांडल्या जातो. 'रमणीयता' येते 'विहार' देखील करता येतो. कविता, गीत, गझल तर चित्रांचं आणि भावनांचं अख्खं जगच निर्माण करू शकते.
तर असे 'दृष्य' जग तटस्थतेने पाहता येणं तसं कठीणच आहे. कारण तुम्ही 'त्यात' असता. त्यात 'असलं' की 'जाणीव' आली. मग 'संवेदना' ही येते. अशा अनेक जाणिवा, संवेदना खूप साचत राहिल्यास 'वेदनाच' होण्याची शक्यता असते. त्यांचा 'निचरा' झाला पाहिजे. त्या व्यक्त व्हायला हव्यात. जसे शब्दांची विशिष्ट रचना केल्याने काव्य आणि साहित्यातील अनेक प्रकार निर्माण होतात. त्याचप्रमाणे चित्रकार एका बिंदूपासून निर्मितीला सुरुवात करतो, बिंदूचा पाठलाग करताकरता त्याला रेष सापडते. मनातल्या दृश्यांनी ती रेष वेगवेगळी वळणे घेत कागदावर उतरते. रेषेला आता गती आलेली असते. उभ्या-आडव्या जोरकस फटकाऱ्यांनी ती आकार धारण करते. रंगांना मग राहवतच नाही. तेही तिच्या सोबत बागडायला येतात आणि मग मनातल्या दृश्यांना आता सांगावं लागत नाही.हात यंत्राप्रमाणे कामाला लागलेला असतो. डोक्यातला मेंदूही 'मन' नावाच्या अदृश्य शक्तीने कार्यरत होतो. संपूर्ण शरीरच 'माध्यम' होते. कोणती तरी 'चैतन्य' शक्ती ते घडवते. चित्रकार 'निमित्त' झालेला असतो.
निव्वळ तटस्थपणे पाहत राहण्याखेरीज त्याला पर्याय नसतो. फक्त समोर जे घडते, ते, तो एक 'दृश्य' म्हणून पाहत असतो. रिक्त होत जाण्यामुळे येणाऱ्या 'तरलतेचा' अनुभवच खूप उदात्त आणि महन्मधुर !
म्हणून मला वाटतं 'दिसण्याने' विचार तयार होत नसावेत, तर विचारांनी 'दृश्य' तयार होत असावे.
...................................................
सतीश पिंपळे, अकोला
मोबाईल नंबर - 9850199323
satishakola@gmail.com
एखद्या चित्राची जन्मकथा यथार्थपणे विशद केलीय.
ReplyDelete