Showing posts with label रघू देशपांडे. Show all posts
Showing posts with label रघू देशपांडे. Show all posts

तीन गझला : रघू देशपांडे


 


१.


चुकले असेल बहुधा शाळेतल्या मुलाचे 

पाहून स्वप्न वेडे आकाश गाठण्याचे 


घडतील ठोस चर्चा निघतील मूक मोर्चे 

करतील साजरेही कोणी इव्हेंट याचे 


तो बाप कोपऱ्याला बसला उदास आहे 

सत्तेसमोर सांगा ऐकेल कोण त्याचे? 


माझ्यात धैर्य नाही शब्दांत सांगण्याचे 

ते दुःख माउलीचे हळुवार काळजाचे 


आत्ताच लेकराला इतकेच बोललो मी 

सोडून दे तयारी अन् वेड शिक्षणाचे 


२.


शृंगार रस जरासा बाजूस ठेवला मी 

अध्याय वेदनेचा  समजून घेतला मी 


सगळेच प्रश्न होते अनिवार्य जीवनाचे 

पेपर तसाच कोरा देऊन टाकला मी 


नुकताच पालवीला वारा झटून गेला

त्याचाच अर्थ माझ्या गझलेत ओतला मी 


सारेच बैठकीला होकार भरत होते 

माझा नकार तेथे मुद्दाम मांडला मी 


म्हणतात मर्म काही सांगू नये कुणाला 

जखमा बऱ्याच होत्या अपमान झाकला मी 


ती एकटीच होती दारात सांजवेळी 

तेव्हा, तिथे तिच्याशी संवाद साधला मी 


३.


डबडबलेल्या डोळ्यांमध्ये तगमग त्याची बोलत होती 

खोल मनाच्या डोहामध्ये एक मासळी खेळत होती 


वादळ-वारे सुटले म्हणजे जिवा लागते घोर काळजी 

इकडेतिकडे पाहुन झाले नजर बिचारी शोधत होती 


सुखदुःखाच्या हिंदोळ्यांनी अंतर मधले वाढत गेले 

तिला भेटले नवे किनारे 

नवे इरादे सांगत होती 


असे वाटले  त्यास शेवटी  मग दरवाजा बंद करावा 

कोंडुन घ्यावी आस आतली जी दैवाला भांडत होती 


रखरखत्या या उन्हात राहुन वर्षाकाठी डोह आटला 

एक बिचारी धार बुडाला 'पाउस पाउस' मागत होती 


....................................................

रघू देशपांडे, 

नांदेड