Showing posts with label सौ.रेखा तांबे. Show all posts
Showing posts with label सौ.रेखा तांबे. Show all posts

तीन गझला : सौ.रेखा तांबे

 


१.


सांग तू मना माझ्या, जायचे कुठे आता

आपल्या अपेक्षांना, न्यायचे कुठे आता


मोकळ्या मनाने मज, वाटते रडावेसे

दुःख प्राशिले मग विष, प्यायचे कुठे आता


भूक भूक करताना आग लागते पोटी

कोण अन्न देणारा, खायचे कुठे आता


मागते सुखी जीवन, ईश्वरा तुला चिंता

फक्त घ्यायचे आम्ही, द्यायचे कुठे आता


भैरवी... तुझ्या हृदयी हात घालते ' रेखा '

ऐकण्यात आहे रस, गायचे कुठे आता


२.


जीवनात हे दुःख कशाला आहे समजत नाही

सदैव घेते शोध सुखाचा कुठे सापडत नाही


प्रत्येकाने सुख पैशाने विकत घेतले असते

बरेच झाले कुणी कुणाला सुख विकू शकत नाही


डोळ्यांमधले नीर बोलते एक वेगळी भाषा

ज्या डोळ्यांना अश्रू नाही त्यांना किंमत नाही


छप्पन प्रकार नैवेद्याचे देवासमोर दिसती

जिथे गरिबास दोन्ही वेळा अन्नही दिसत नाही


खूप वाटते मला करावी समाजसेवा बाई

आईपण हे विशेष म्हणुनी पायही निघत नाही


३.


सूर येता साथ द्यावी वाटले

आर्ततेने तान घ्यावी वाटले


शब्द सुंदर भाव सुंदर दाटले

गेयता गजलेस यावी वाटले


धुंद पावा ऐकते मी ज्या क्षणी

राधिकाही मीच व्हावी वाटले


स्वप्न मी साकारताना गुंतले

आगळे ते रुप प्रभावी वाटले


चालतो जेव्हा सखा माझ्यासवे

साथ ही कायम असावी वाटले


..................................................