Showing posts with label सौ. प्रज्ञा कुलकर्णी. Show all posts
Showing posts with label सौ. प्रज्ञा कुलकर्णी. Show all posts

दोन गझला : सौ. प्रज्ञा कुलकर्णी

 




१.


उमदा खयाल त्याचा झालाच पाहिजे

प्रिय शेर तो जगाचा झालाच पाहिजे


वेधक खयाल जेव्हा शेरात राबतो

भोई गझल रथाचा झालाच पाहिजे


लिहिलाय जो मुकर्रर मी शेर शायरा

प्रेमी मुशायऱ्याचा झालाच पाहिजे


झाली पसंत मुलगी मग बेत कोणता

मिष्ठान्न भोजनाचा झालाच पाहिजे


ग्रीष्मातही रहावी ओली जमीन इतकी

जड फाळ नांगराचा झालाच पाहिजे


२.


साहित्याचे अबोल घरकुल नांदत असते मुखपृष्ठावर

वाचनवेडी तरल लेखणी चित्त खिळवते मुखपृष्ठावर


ऋणात रमणे पसंत करते सदासर्वदा काळी शाई 

अक्षरावरी मुक्त वैखरी हक्क ठेवते मुखपृष्ठावर


पानांवर ऋण निर्देशाची शुद्ध मिमांसा पटते तेव्हा 

ऋण बंधाच्या स्मृतीपटाची घडी जुळवते मुखपृष्ठावर 


पानांमधुनी निर्भय फिरतो कणा बनूनी पुस्तक प्रेमी 

नैराश्याचा रिता खुबीने घडाच करते मुखपृष्ठावर 


गंध नव्याचा आतुर करतो स्मृतीत रेंगाळतो जुनाही

आल्या गेल्या वेड्या वाटा हरवुन बसते मुखपृष्ठावर 


जीर्ण झाले तरी न होते पुस्तकांचे निर्माल्य कधीही 

मृत्युनंतरहि अजरामर हे नाव कोरते मुखपृष्ठावर 


बैठकीतले वैभव म्हणजे पुस्तक दालन खरेपणाचे

निर्विवाद नैतिकतेचे वर्चस्व स्थापते मुखपृष्ठावर 


....................................................

सौ.प्रज्ञा कुलकर्णी 'राज्ञी '

वसमत जि.हिंगोली