Showing posts with label अपर्णा नैताम. Show all posts
Showing posts with label अपर्णा नैताम. Show all posts

तीन गझला : अपर्णा नैताम





१.


मनाआतले कोपरे आज वाचू 

किती आत पडले चरे आज वाचू


व्यथा आसवांची व्यथेला कळेना 

मनी गोठलेले झरे आज वाचू 



मला सापडेना सुगावा कशाचा 

कसे काय खोटे, खरे आज वाचू 


जिथे आर्त देतात भिंती उसासे  

अशी भग्न पडकी  घरे आज वाचू 


नको बेगडी कौतुकाची प्रशंसा 

टिकेचे धडे बोचरे आज वाचू 


२.


हे दुरावे तुझे बारमाही नको 

सोबती तू हवी, फार काही नको!


खूप बोलायचे भेटल्यावर तुला 

बोलताना तुझे होय-नाही नको


पेटते आत कर्तृत्व कामामुळे 

फक्त त्याची फुकट वाहवाही नको


रंग नात्यास देऊ मनासारखे 

प्रेम त्यांच्यातले फक्त शाही नको


बोल ओठांमधे पण हवे साजरे 

बोलताना तुझी शब्द-लाही नको


भेट होणार आहे पुढे आपली 

मग दुरावा तुला अन् मलाही नको


३.


काळजी आतली भरजरी  वाटते 

वेदना त्यातली कापरी  वाटते


बाप होता उभा विठ्ठलासारखा 

घर मलाही जुने पंढरी वाटते !


संकटाला कुणी सोबतीला नसे 

खंत तेव्हा मुकी मज बरी वाटते


धीर देते मला सारखी-सारखी 

लेक माझी मलाही परी वाटते


बोलती हुंदके दाटतो कंठही 

वेदना ही मला बासरी वाटते


सावराया मला हात देते पुन्हा

प्रेरणा एक त्यांची खरी वाटते

..................................................