Showing posts with label गौरवकुमार आठवले यांची गझल : प्रा. डॉ. संजय पोहरे. Show all posts
Showing posts with label गौरवकुमार आठवले यांची गझल : प्रा. डॉ. संजय पोहरे. Show all posts

गौरवकुमार आठवले यांची गझल: प्रा. डॉ. संजय पोहरे

 



         गणेश उर्फ गौरवकुमार विश्राम आठवले यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६८ लोहारा, ता. कारंजा लाड, जि. वाशिम येथे झाला.१३ जानेवारी २०२४ रोजी  त्यांचे नाशिक येथे निधन झाले. त्यांचे ‘सवाल’ (२०००)  आणि ‘मांडतो फिर्याद मी’ (२०११) हे दोन गझलसंग्रह प्रसिद्ध आहेत. सुरेश भटांनंतरच्या विदर्भातील मराठी गझल लिहिणाऱ्या दुसऱ्या पिढीतील महत्त्वाचे गझलकार म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागतो. त्यांच्या 'मांडतो फिर्याद मी' या गझलसंग्रहाच्या अर्पण पत्रिकेत गझलसम्राट सुरेश भटांविषयी ते म्हणतात-

'सदैव पाठीवरून फिरतो कृतार्थतेचा हात तुझा
ध्वज गझलेचा फडकत ठेवू पिढ्यापिढ्या गगनात तुझा

या दुनियेला गाण्यासाठी तू गझलांचे दान दिले.
माय मराठीसाठी गेला जन्म खरा झिजण्यात तुझा

रुपगंधेवर सप्तरंग, उधळून वेगळा रंग तुझा
अजूनही एल्गार गाजतो, अजून झंझावात तुझा

तुझ्या नभी घेतसे भरारी गझलेची एकेक पिढी
तुझी प्रेरणा मनात आहे, जोम असे देहात तुझा

समीक्षकांनी कधी न केली जरी तुझी वाहवा कुठे
तरी विराजे शब्दशब्द हा रसिकांच्या हृदयात तुझा'

'आदरणीय गझलसम्राट सुरेश भट यांना सविनय अर्पण '

       अर्पण पत्रिकेतूनच गौरवकुमार आठवले यांची गझल लेखनाची भूमिका स्पष्ट होते. सुरेश भटांच्या गझल चळवळीच्या इतिहासातून वर्तमान काळात गझलेचा प्रवाह कसा व कोणत्या दिशेने करावा याचा जणू ते वस्तुपाठच मांडतात.
         गौरवकुमार आठवले यांच्या गझलेतून सामाजिक व्यवस्था, संस्कृती, परंपरा, रूढी, वास्तव, संघर्ष, निसर्ग, प्रेम, मानवी मनाचे दर्शन, अनुभवाचे दर्शन, आत्मपरीक्षण, इ. विषयांची मांडणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या गझलेला जशी सुरेश भटांची प्रेरणा आहे, तशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या विचारांच्या मुशीतून तयार झालेल्या मानवतावादी तत्त्वज्ञानाचे ते पाईक आहेत. आई-वडिलांच्या अपार कष्टाच्या जीवनानुभवाचा आदर्श त्यांच्यासमोर आहे. म्हणून त्यांची गझल प्रेम, निसर्ग वा शृंगारापेक्षा सामाजिक जाणिवेमध्ये फार रमते.

'इतकाच एक माझा त्यांना सवाल आहे
का रंग माणसाच्या रक्तास लाल आहे? '

डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी एके ठिकाणी असे म्हटलेले होते की, जगातील माणसांचे रक्तगट हे फक्त चार प्रकारचेच असतात. पाचवा रक्तगटच नाही. या चार रक्तगटांमध्ये जगातील माणसाच्या गुणसूत्रांची तपासणी केली असता असे निदर्शनास आले की, ९९.९७ टक्के गुणसूत्रे सारखीच आहेत. त्यामुळे एखादा धर्म, एखादी जात, एखादे कूळ हे रक्तशुद्धतेच्या कारणामुळे समाजामध्ये स्वतःचे स्थान वेगळे करून घेते, त्या घटनेवर हे संशोधन अवैज्ञानिकतेचा शिक्का मारते आहे, त्याला नाकारते आहे. उपरोक्त गौरवकुमार आठवलेंच्या शेराचा विचार केल्यास हे सर्व तत्त्वज्ञान गझलकाराला माहिती आहे. जातीच्या, धर्माच्या नावावर चाललेली विषमता ही नैसर्गिक नसून ती खुळचट मानसिकतेतून निर्माण झालेली मानव निर्मित कुबुद्धीची निदर्शक आहे, असा सवाल ते उभा करतात.

'एकटे गेले म्हणूनी संपले समजू नका
आणखी रक्तात अमुच्या पेरले दाभोळकर '

रक्ताचा संदर्भ देऊन गौरवकुमार आठवले असे म्हणत असले, तरी त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणारे, विवेकवादी विचार मांडणारे विज्ञानवादी विचारांचे दाभोळकर आमच्यामध्ये जिवंतच आहेत, असे म्हणून ते विचारांच्या रक्ताचे नाते जुळवितात. माणूस त्यांना मोठा वाटतो. मग तथाकथित, कपोलकल्पित दगडाच्या देवांपेक्षा-

'माणसांना चल जरा समजून घेऊया
व्यर्थ दगडांनाच का ओवाळतो आपण? '

संत गाडगेबाबांच्या विचारांची आठवण व्हावी, या प्रखरतेने ते समाजातील परिवर्तनवादी विचारांच्या चळवळींची भाषा प्रकट करून जातात आणि माणसाला समजून घेण्याची किती निकड आहे, हे अधोरेखित करतात. त्यांच्या गझलेविषयी बोलताना यशवंत मनोहर असे म्हणतात,
'गौरवकुमारांची फिर्याद मानवी मनाच्या तळघरामधील विषारी सापांच्या दंशांविरूद्धही आहे, तशी भांडवली जागतिकीकरण आर्थिक आणि धार्मिक दहशतवादाच्या क्रौर्याविरूद्धही आहे. आज छोट्या नवजागृत समूहांच्या अस्तित्वांचे, त्यांच्या मानावर करू पाहणाऱ्या मूल्यदर्शी राजकारणाचे आणि त्यांच्या भाषांचे मृत्युलेख लिहिले जात आहेत. जगातील सर्वच प्रस्थापितांच्या या बेबंदशाहीविरूद्ध मांडली गेलेली ही फिर्याद गझल सौंदर्यानेही अत्यंत समृद्ध आहे.'
गौरवकुमार आठवलेंच्या समग्र गझलेचा अर्क म्हणजेच त्यांची केलेली ही समीक्षा आहे आणि सुरेश भटांच्या पुढचा टप्पा जागतिकीकरणाच्या काळातील समस्यांवरही गझल भाष्य करताना दिसतो, हेही मनोहरांच्या वक्तव्यातून कळून येते.

'गुलाम केले या देशाचे बहुजन त्यांनी
धर्माच्या नावावर केले विघटन त्यांनी '

भगवान बुद्धांनी ‘बहुजन हिताय् बहुजन सुखाय’ म्हणत संपूर्ण मानवजातीच्या बहुसंख्य लोकांचे कल्याण व्हावे, अशी अनुकंपा चिंतलेली होती. त्या काळात धर्म, पंथ वा वंश या नावाने अभिजनांच्या संधिसाधू विचारांतून सर्वसामान्य जनतेचे शोषण होत होते. तीच विघटनवादी परंपरा आजही गौरवकुमार आठवल्यांना दृष्टीस पडते आणि अभिजनवादी विचारांतून धर्म, धर्मशास्त्र, धर्मग्रंथ, ग्रंथप्रामाण्य अशा आयुधांतून बहुजन समाजाला गुलाम बनविण्याचे षडयंत्र केले जाते. याच आयुधांचा वापर करून त्यांनी हजारो वर्षे आमच्यावर गुलामगिरी लादली. या ऐतिहासिक संचिताच्या पिढ्यांपिढ्यांच्या अनुभवातून ते सजग होऊन आपल्या बहुजन बांधवांना सांगतात-

'विझली न आग त्यांच्या मेंदूस लागलेली
होऊन प्रेम-वर्षा बरसून पाहिले मी '

जात-धर्म, भेदाभेद, उच्च-नीचता ही डोक्यात आहे. ती नैसर्गिक नसून ती मानवनिर्मित आहे. ती द्वेषाची आग शांत व्हावी, सर्व मानवजात ही एकच आहे म्हणून आपण स्वतः प्रेमाने वागावे, कुणी कसेही वागो. बंधुभावाच्या भावनेने गुण्यागोविंदाने राहावे; परंतु त्यांच्या डोक्यातील विषमतेची आग, उच्च-नीचतेची विकृत मानसिकता बदलताना दिसत नाही, हे वास्तव गौरवकुमार आठवले अनुभवाअंती मांडतात.

'वाघ होऊन जगणे आता शिकून घे तू
कुणाकुणाची कुठवर होते शिकार मित्रा? '

गौरवकुमार आठवलेंची सामाजिक जाणिवेची गझल आंबेडकरी, क्रांतिकारी विचारांची गझल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, 'शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा! कारण शिकार ही नेहमी शेळपटांची होत असते, वाघाची नाही. ' हा स्वाभिमानी जगण्याचा मंत्र गौरवकुमार आठवलेंनी आपल्या मनावर कोरून घेतलेला दिसतो.

'सदैव ताठ राहिलो कुणापुढे न वाकलो
गुन्हा करीत राहिलो असाच जीवनात मी '

अभिजन समाजाला बहुजनांचे स्वाभिमानाने जगणे डोळ्यात खुपत होते. तो त्यांना गंभीर असा गुन्हाच वाटत होता. समाजाच्या स्तरीकरणाची भेदक वस्तुस्थिती आठवले चितारत आहेत. याच गुणांमुळे कवी फ. मुं. शिंदे त्यांच्या गझलेविषयी म्हणतात,
'गौरवकुमार आठवले हे तसे समजुतीने काव्यलेखन करणारे नवे कवी आहेत. त्यांच्यातला विचारी माणूस स्वतःसकट समाजालाही काही प्रश्न विचारतो, तेव्हा व्याकुळतेच्या पलीकडे अन्य काही उत्तर गवसत नाही. प्रश्नातूनही कवीची विचार दृष्टीदृग्गोचर होत जाते. कवी विचारानं, उच्चारानं मानवतेचा कैवारी आहे. सकस कवितेचा तो श्वास आहे. चिंतनाचं सूत्र जिथं माणूस असतो तिथं कवितेच्या दृष्टीनं जोखीम वाढलेली असते. ती जोखीम पत्करून गौरवकुमार आठवले गझलेकडे वळले आहेत. इथला माणूस प्रेमातही, प्रकोपातही फक्त माणूस कधीच नसतो, त्याच्या वाहण्याचं वळण व्यवस्थेनं रचून, बांधून ठेवलेलं असतं. तेच कवीसमोर मोठं आव्हान असतं. लोककवी शाहीर वामनदादा कर्डक यांची कविता त्याचा आदर्श वस्तुपाठ आहे. गझलेतही प्रासाद असावाच लागतो. सुदैवानं त्याचं भान गौरवकुमार आठवले यांना आहे.'
सामाजिक गझलांसोबतच त्यांनी लिहिलेल्या राजकीय, प्रेमविषयक, वैयक्तिक जीवनानुभव, आई-वडिलांची वत्सलमूर्ती, पर्यावरणविषयक  गझलेविषयी, शिवाजी जवरे सवाल  करतात, 'भटांनंतरच्या गझलेचे हे वेगळेपण नाही काय? सोबतच विनोदी अंगाने लिहिलेल्या हझलचा प्रयोगही त्यांनी केलेला आहे.

'स्त्री जाणिवेची गझल'

'चार महिला बैसल्या दिल्लीत म्हणुनी
सर्व स्त्रियांचा कुठे उद्धार झाला?'

समाजामध्ये स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा लोक करीत असतात. आज स्त्रीसुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. बऱ्याच क्षेत्रातल्या एक-एका महिलांचे नावे देऊन स्त्री स्वातंत्र्याला हरताळच फासण्याचे काम होत असते. उपरोक्त गझलेमध्ये गौरवकुमार आठवले वरवर स्त्रियांच्या विषयी निराशावादी विचार तर मांडत नाही ना? अशी शंका येते. या उलट स्त्री स्वातंत्र्याचा ते सूक्ष्म विचार करताना दिसतात. बोलघेवड्या व वरवरच्या स्त्री स्वातंत्र्याला, वास्तव स्त्रियांची परिस्थिती किती भयंकर आहे? पुरुषप्रधान संस्कृती ज्ञात असल्यामुळे ते वरील गझलेतून त्यांना प्रश्न विचारतात चारपाच स्त्रिया उच्चपदावर गेल्या म्हणून संपूर्ण स्त्रीजातीचा उद्धार होतो का? तर आणखी आम्हाला आमची पुरुषी मानसिकता बदलून स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्रिया सुरक्षित होतील व उद्धाराला सुरुवात होईल.

'जरी सुरक्षा असे कायदे महिलांसाठी
तरी नेमकी कुटुंबसंस्था बिघडत आहे.'

महिलांसाठी अनेक कायदे आहेत. त्यांच्या बरोबरीच्या हक्कासाठी, एखादी स्त्री सरपंच जरी झाली, तरी तिचा संपूर्ण कारभार तिचे पतीदेवच करताना दिसतात. तेव्हा कायद्याने तिला सरपंच बनण्याचा हक्क दिला. परंतु प्रत्यक्षात तिला तो मिळालाच नाही, असे म्हणावे लागते. जसे वडिलांच्या संपत्तीवर जेवढा अधिकार मुलाचा असतो, तेवढाच अधिकार मुलीचासुद्धा असतो असे कायदा सांगतो. पण प्रत्यक्ष समाजाचे चित्र पाहिल्यास असे दिसते की, परंपरागत कुटुंब संस्कारामुळे असे बिंबविले जाते की, मुलगी वडिलांच्या घरून लग्न होऊन गेल्यावर तिचा कोणताही अधिकार त्या घरावर व त्या परिवाराच्या संपत्तीवर राहत नाही. फक्त दिवाळी-भाऊबीजेला तिला हक्क म्हणून साडी तेवढी मिळते. अशा मानसिकतेमध्ये स्त्रिया असल्यामुळे कायदे असून त्याचा फायदा मात्र होत नाही. आणि समाजाचे ठेकेदार वरून म्हणायला तयार असतात की, या कायद्यामुळे कुटुंबसंस्थाच बिघडत चालली. हा जर स्त्री कायद्याचा व सुधारणेचा अर्थ आम्ही काढत असू तर काय होईल?

'भ्रूणहत्या थांबवाया, पालकांच्याही अता
मानसिकतेवर खरा उपचार झाला पाहिजे'

'ओल हृदयातली, वीज गगनातली
ऐन ग्रीष्मातला गारवा पोरगी. '

स्त्रीची मुस्कटदाबी तिच्या जन्मापासूनच सुरू होते. मुलगाच हवा ही पुरुषी समाजव्यवस्थेची मागणी स्त्रियांच्या जिवावर बेतते. वंशाला दिवाच हवा, मुलीला जन्म देऊन काय तोंडाला काळं फासायचं आहे? मुलगी म्हणजे परक्याचे धन, हुंड्याचा डोंगर, वडिलांची काळजी. अशा नाना प्रकारच्या पुरुषी मानसिकतेच्या विधानाने स्त्रीजन्मच नकोसा केलेला आहे. अशा परंपरागत खुळचट विचारांच्या प्रवाहाच्या विरूद्ध बाजूने जाण्याचे कसब गौरवकुमार आठवले यांच्याकडे आहे. म्हणून ते स्त्री जन्माचे स्वागत करतात. तिला हृदयातील ओलावा म्हणतात, तिला ग्रीष्मातला गारवा म्हणतात, तिला जिजाऊ, सावित्री आणि क्रांतीचा झरा म्हणतात.

'तू जिजाऊ, तू रमाई तूच सावित्री
तू उद्याच्या क्रांतिचा आहे झरा बाई'

ही समतेच्या विचारांची ताकद खऱ्या अर्थाने गौरवकुमार आठवलेंच्या गझलेची बलस्थाने आहेत. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा गझलेला प्रकाशमान करते. भटोत्तर गझलेतील ते एक सक्षम आणि स्वतंत्र अभिव्यक्तीचे गझलकार आहेत यात शंकाच राहत नाही. भटोत्तर गझलेविषयी ज्येष्ठ गझलकार संगीता जोशी म्हणतात “आजची मराठी गझल भटांच्या पाऊलखुणा वेचत पुढे जात आहे. मात्र त्यातही ज्यांनी केवळ अनुकरणाच्या सीमा पार केल्या, त्यांची गझल अधिक समृद्ध आहे. नव्या पिढीतील गझलकारही सुरुवातीला अडखळतात, त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. त्यांचे लेखन दुरुस्त करण्याची गरज भासते. कुठल्याही क्षेत्रातली पहिली पावले अडखळत पडत असतात, तरीही नव्यापिढीतील अनेक गझलकार चांगले लिहीत आहेत. सिद्धार्थ भगत, गौरवकुमार आठवले, फातिमा मुजावर, भूषण कटककर, अश्विन जावळेकर, कैलास गायकवाड, राधा भावे, ललिता बाठिया, ए. के. शेख, बबन सराडकर, सुप्रिया जाधव, वैभव जोशी अशी अनेक नावे आहेत, जे मराठीत चांगली गझल लिहीत आहेत. सुरेश भटांच्या गझलेच्या पुढचा टप्पा हा मुख्यत्वे जागतिकीकरणाच्या परिणामाचाच होता. त्यामुळे जागतिकीकरणाच्या चिंतनाचे पडसाद मराठी गझलेमध्ये पडले नसते तर नवलच. जागतिकीकरणाचा परिणाम एकूणच मानव जातीच्या जगण्यावर कसा पडला;, विशेषतः सर्वसामान्य माणसाच्या भावविश्वावरील परिणामांचे चित्रण आलेले आहे.
सुरेश भटांनंतरच्या गझलेमध्ये जागतिकीकरणाचे कसे परिणाम होत गेले, हे आपल्याला गौरवकुमार आठवले यांच्या गझलेत दिसतात. जागतिकीकरणाच्या गझलेविषयी डॉ. अशोक इंगळे म्हणतात, 'गझलसारख्या तंत्रदृष्ट्या अवघड अशा रचना प्रकारातूनही जागतिकीकरणाचे प्रतिबिंब उमटायला प्रारंभ झाला आहे. सिद्धहस्त गझलकार गौरवकुमार आठवले त्यातील एक महत्त्वपूर्ण नाव आहे. खरे तर गझल म्हटली की, शृंगार, प्रेम, विरह, मिलन यासारखे पारंपरिक विषयच त्यामध्ये प्रामुख्याने हाताळलेले दिसतात. परंतु नव्वदोत्तर गझलकारांमध्ये खाऊजा प्रक्रियेवर अतिशय जोरकसपणे प्रहार करणारी गौरवकुमार आठवलेंची गझल म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. जागतिकीकरणाच्या धोरणाचा परिणाम इथल्या कष्टकरी, कामगारांवर कसा झाला, त्याचे रोजगार हिरावले गेले, नव्या गुलामगिरी सारखी व्यवस्था निर्माण झाली, याचे हृद्य चित्रच ते चितारतात.

'खाऊजाची शाल पांघरुन आर्थिक मंदी नाचत आली
गिळून गेली कष्टकऱ्यांचा क्षणार्धात रोजगार आता '

'संगणकाने बनले जग हे गोजिरवाणे ग्लोबल खेडे
माणुस झाला इथे नेमका जगातुनी हद्दपार आता'

सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा पेच निर्माण होण्यासाठी जागतिकीकरणाची जुगार व्यवस्था आली. त्यामुळे त्या व्यवस्थेचा तो कसा शिकार झाला हेही त्याला कळले नाही. संगणकाच्या अतिमहत्त्वामुळे माणूसच दुय्यम ठरवला गेला. आधी अभिजनांची भाषा नाही, म्हणून तो दूर सारला गेला, नंतर शिक्षण नाही म्हणून त्याची अधोगती झाली. इंग्रजीचे ज्ञान नाही. आता संगणक साक्षरता नाही. अशा वेगवेगळ्या कारणांनी सामान्य माणसाला नाकारले गेले. हेच जर जागतिकीकरणात होत असेल, तर या व्यवस्थेचाही गझलकार विरोध करताना दिसतात. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झालेला दिसतो.

'कृषी जाणिवेची गझल'

गौरवकुमार आठवले सर्वसामान्य माणूस, बहुजन समाज असे प्रतीक त्यांच्या गझलेतून येतात. तिथे शेतकरीसुद्धा त्यांना अपेक्षित आहे.

'काय मागू भाव त्यांना शेतकी मालास माझ्या?
मखमली खुर्चीच ज्यांची सारखी धोक्यात आहे '

उपरोक्त शेरामध्ये नेत्यांच्या नैतिकतेलाच गझलकार हात घालतात. खरेच नेते शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हितासाठी खुर्चीवर बसलेले आहेत का? आपली मखमली खुर्ची सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करून घेत आहेत. जो तो नेता उठतो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेंबीच्या देठापासून बोलतो. पण खरोखर शेतकऱ्यांच्या जीवनात फरक पडताना दिसत नाही.

'आत्महत्या नव्हे संकटांची दवा
मार्ग जगण्या नवा शोधला पाहिजे'

शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात सापडलेले आहेत. याची पूर्ण जाणीव गझलकाराला आहे. म्हणून कितीही संकटे आली तरी माणूस जगला पाहिजे. त्याने नवे नवे प्रयोग करून यातून मार्ग काढला पाहिजे. हीच गझलकाराची प्रामाणिक इच्छा दिसते. शेतकऱ्यांनी नेत्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवून या संकटातून मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी कोणत्याही मार्गाला जाण्याची गरज पडली तरी गझलकार ते स्वीकारायला सांगतात.

'भीक मागूनी कधी का न्याय मिळतो?
हक्कही आता तुझे झगडून घे तू'

शेतीमालाला भाव, सावकाराला जाब, सरकारला कर्जमुक्ती असे मागून काही मिळत नाही. तेव्हा आपल्या हक्कासाठी लढण्याची तयारी ठेवायला पाहिजे. असा संघर्ष करण्याचा सल्लाच शेतकऱ्यांना गौरवकुमार आठवले देताना दिसतात. सुरेश भटांनंतरच्या मराठी गझलेमध्ये विविधांगी गझल लिहिली आहे. गझलेला कोणत्याही विषयाचे बंधन नाही. गौरवकुमार आठवले आंबेडकरी कवितेच्या परंपरेतील गझलकार आहेत. परंतु त्यांची निष्ठा गझल या आकृतिबंधावर असल्यामुळे तिला पूर्णतः न्याय त्यांनी दिला आहे, असे म्हणावे लागेल.

( 'सुरेश भटांनंतरची विदर्भातील मराठी गझल '
ह्या संशोधन ग्रंथामधून )
.................................
प्रा. डॉ. संजय पोहरे,
मराठी विभाग प्रमुख,
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला
मो. ९८२२२९६१२७