१.
या सुखांनो या, जरा माझे पहा हे झोपडे
दुःख एकाकीच येथे, या बघा त्याच्याकडे
दाटला अंधार येथे देव झाला आंधळा
मी उजेडाचे अता घालू कुणाला साकडे
पाय पोटाशी कसे घ्यावेत उपजत माहिती
त्यामुळे मज अंथरुण नाहीच पडले तोकडे
काच तू पाषाण मी रे, कर्म की संयोग हा?
स्पर्श झाला जेवढ्याला तेवढे गेले तडे
राख माझी धुमसली, आहे पुन्हा उठणार मी
सज्ज ठेवा ढोल ताशे सज्ज ठेवा चौघडे
२.
ठेवतो विश्वास मी जेंव्हा तिच्यावर
थाप नेतो मग तिची मी हासण्यावर.
स्पर्श ओझरताच झाला ओढणीचा
केवढी धुंदी पसरलेली मनावर
जन्म एकाकीच जळला त्या चितेचा
थांबली इतकी कुणाच्या भरवशावर
सोसला वर्षाव असता मी शरांचा
टाचणी रुतलीच पण या गालिच्यावर.
ओळ गझलेची सुगंधी होत जाते
बोट जेव्हा ठेवते ती काफियावर
मी कसा विसरून जाऊ मोल त्यांचे
कोळसा ओढून जे गेले हिऱ्यावर
शेवटी इतकेच मी सांगून जातो
आसवे सांडू नका माझ्या मढ्यावर
३.
पाकळ्यांची शेज केवळ अन् तुझा शेजार होता
वेगळी होती मिठी अन् आगळा अंधार होता
मोरपंखाच्या रुपाने स्पर्शले होतेस तू की
मलमली देही विजेचा रेशमी संचार होता
काय आर्जव कोण मार्दव शब्द की ती मोहमाया
कोवळ्या कंठी जणू तो मारवा अलवार होता
सातवीचा वर्ग, त्याची आठवी होतीस तेव्हा
गैर म्हणणे गैर होइल तो वयाचा भार होता
मौन ओठांचे तुझ्या घेऊन गेले जीव त्याचा
बोलली असतीस "हो" तर तो तुझा होणार होता
जीव गेला देह जळला ओढ नव्हती संपलेली
आसवे पुसण्या तुझी ती तो पुन्हा येणार होता
प्रार्थनेने जन्मला अन् सोहळ्याने वाढला तो
वागला नाही बरा पण चांगला संस्कार होता
....................................................
