१.
दुःख फिक्कट वाटले जर पाहिजे
काळजाला एक अस्तर पाहिजे
नेमका होईनसुद्धा व्यक्त मी
शब्द हाती लागला तर पाहिजे
जर हवेवर भूतकाळी जायचे
आठवांची आत सावर पाहिजे
पीक वाऱ्यावर पुन्हा डोलेलही
पेरणीला तीच पाभर पाहिजे
वेगळे अवकाश दोघांना हवे
तर खुबीने आखले घर पाहिजे
पोचण्याची झिंग जर असली हवी
चालण्याची वाट खडतर पाहिजे
पैठणी वाटेल माझी वेदना
फक्त पदरावर तुझी जर पाहिजे
सामना प्रत्येक येतो जिंकता
आपल्या संघात ईश्वर पाहिजे
२.
श्वासामागुन श्वास घ्यायचा तणाव आहे
जगणे कसले ? हा मरण्याचा सराव आहे
प्रेम इथे आधीच कमी येते वाट्याला
त्यातही कुणा अज्ञाताचा कटाव आहे
पुन्हा दाटते एकाकीपण तेव्हा कळते
तुझी भेट फसव्या नियतीचा बनाव आहे
आसपासही माझ्या नाही फिरकायाचे
म्हणे सुखांच्या सभेत झाला ठराव आहे
आत कधीचे भांडण नशिबा तुझ्याविरोधी
पण ओठांवर परिस्थितीचा दबाव आहे
सरकत आहे गर्दी कां इतक्या वेगाने ?
की हा कोणी चिथावलेला जमाव आहे ?
किती पहारे इंद्रियांवरी बसवत गेलो
पण इच्छांचा गात्रांमधुनी उठाव आहे
शिव शोधाया कैलासाचे शिखर गाठले
तेव्हा कळले हा तर नुसता चढाव आहे
रेतीमध्ये पाय रुतू लागताच दिसला
पैल न्यायला उभा कधीचा पडाव आहे
३.
उरावर हे चरे कसले, कुणाला काय सांगू मी ?
कुठे ती सावली गेली उन्हाला काय सांगू मी ?
जशी बुद्धी, तसा प्रत्येकजण समजून घेऊ दे
स्वतःविषयीच लोकांना कशाला काय सांगू मी ?
मलाही नीटसे अजुनी कुठे कळलेच आहे ते ?
तुझ्या माझ्यातले नाते जगाला काय सांगू मी ?
भिजायाचे जुने ते वेड आता हरवुनी गेले
मला ओलांडुनी जात्या नभाला काय सांगू मी ?
मघाशी ठासुनी म्हटले कुणावर भाळलो नाही
जगाला फसवुनी आलो स्वतःला काय सांगू मी ?
मला ठाऊक आहे जे कपाळी कोरले आहे
तरी समजावताना या मनाला काय सांगू मी ?
कधी जगलोच नाही जर सुखे वाट्यास आलेली
उद्या बहरून येणाऱ्या क्षणाला काय सांगू मी ?
...................................................
