Showing posts with label शीला टाकळकर. Show all posts
Showing posts with label शीला टाकळकर. Show all posts

तीन गझला : शीला टाकळकर

 



१.


काय ठेवले ,कुठे ठेवले ; मीच ठेवले स्मरू किती 

रोज रोजची एकटीच मी आवरसावर करु किती 


साठीनंतर साथ सोडती, अवयव सारे ,असे कसे?

मेंदूचाही रांजण गळका पळी पळीने भरू किती.


कलप लावुनी केसांना मी, फ्राॅक घातला नवा जरी ,

आजोबाही 'आज्जी ' म्हणती, राग मनावर धरू किती.


"सुंदर दिसता आजही तुम्ही, वाटत नाही साठीच्या"

उपहास तरी का मोहरते ,मूर्ख अशी मी ठरू किती.


नट्टापट्टा करून मीही, ठेका धरते नृत्याचा.

सेल्फीवरही सुखावणारी,

माझ्यावर मी मरू किती


२.


आपला खोपा तुझा जर कोष झाला

सांग आता हा कुणाचा दोष झाला?


बोलले नव्हतेच मी जर स्पष्ट काही

तर 'कुबुल है ' चा कसा जल्लोष झाला?


का हुतात्म्याची मुलेबाळे उपाशी?

जर अमर है चा तिथे जयघोष झाला


घातला त्याच्या कुणी का घाव वर्मी

आमचा 'विश्वास'ही बेहोष झाला


तो सखा,भाऊ, मामा कधी कुणाचा

डाग असुनी चंद्र बघ निर्दोष झाला 


चालताना एकटी अंधार रात्री

मी तरी दिसते मला संतोष झाला


३.


पडले धुके म्हणू की माझी अधू नजर 

ते रंग इंद्रधनुचे झालेत ना धुसर?


वारा सुजाण झाला करतो तुझी कदर

नाहीस घेतला तू आता जरी पदर 


भेटायला तुला मी आले कशीबशी

सोडून मुख्य मुद्दा का बोललो इतर


होतात वाद अपुल्या मैत्रीत रोज तर 

शोधू उपाय त्यावर आणू मनात जर 


खावून टाकल्यावर गावे नजीकची 

पोटास वाढलेल्या म्हणते कुणी शहर


सांगू कधी तुला मी माझ्या मनातले

असतोस नेहमी तू कामात मग्न तर


होईल फक्त जखमी नाही मरायची 

बाणास लाव आधी थोडे तरी जहर 

...................................................