१.
'बदला, बदला...बदला' म्हणता!
'बदल' नेमका कसला म्हणता?
तयार झालो बदलण्यास तर
'तसला नाही... असला' म्हणता!
किती हुशारी तुमच्या अंगी,
करून परका, अपुला म्हणता?
कधी चांगले लिहिले मी, तर,
'प्रयत्न तुमचा फसला' म्हणता!
हात जोडतो चतुराईला...
शेर नको तो पटला म्हणता!
कमाल करता राव तुम्ही तर,
मक्त्यालाही मतला म्हणता!
गझलांच्या या हमरस्त्यावर,
कवितेलाही गझला म्हणता!
जरा रडू द्या, जरा बघू द्या
श्वास थांबता 'उचला' म्हणता!
२.
येऊन का अवेळी, छळतात भास आता?
विसरू जरी पहातो, स्मरतात भास आता
त्या चोरट्या मिठीची, उबदार ओढ छळते
हलकाच स्पर्श होता, विरतात भास आता
ती ओढ जीवघेणी, अन् रात्र लांबलेली
भंगून स्वप्न अर्धे, उरतात भास आता
मजला नको फुलांचे, गजरे सुवासणारे
श्वासांतल्या फुलांनी, सजतात भास आता
सांगू नको पुन्हा तू, माझी मलाच नाती
मारून भावनांना, जगतात भास आता
डोळ्यांतल्या घनांना, मी थोपवू पहातो
हलकेच याद येता, झरतात भास आता
३.
प्रेमावरती, विरहावरती लिहून पाहू
स्वप्नभारल्या क्षितिजावरती लिहून पाहू
कान्हा, मुरली, वृंदावन अन् गोपगोपिका,
राधा, मीरा, यांच्यावरती लिहून पाहू
कुठून येते तुझी आठवण अशी सारखी?
आठवणींच्या उगमावरती लिहून पाहू
डोळ्यांमध्ये उधाणलेला पुसून सागर,
नाव आपुले पाण्यावरती लिहून पाहू
विरह संपुनी, 'ओढ' बिलगता नवी नवेली,
थरथरणाऱ्या अधरावरती लिहून पाहू
या नशिबाचे नको नकोसे उलटे फासे,
सटवाईच्या भाळावरती लिहून पाहू
राजा, राणी होऊ आपण… पुन्हा नव्याने,
भातुकलीच्या खेळावरती लिहून पाहू
...................................................