Showing posts with label राजेश्वर शेळके. Show all posts
Showing posts with label राजेश्वर शेळके. Show all posts

तीन गझला : राजेश्वर शेळके

 




१.

दिखावा लागतो मित्रा, दिखाव्याची गरज आहे
जगाला फक्त एखाद्या बहाण्याची गरज आहे

विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांनो थांबवा जथ्थे
इथे काही पलीत्यांना निखाऱ्याची गरज आहे

जरासे खट्ट झाले की जमाया लागते गर्दी
रिकामे लोक हे यांना तमाशाची गरज आहे!

तुझे रडणे, तुझा टाहो जरी सगळे खरे आहे
तरी न्यायासनाला बस्, पुराव्याची गरज आहे

घटस्फोटास दोघांनी दिला होकार आहे, पण
मुलांना नेमकी,आई नि बापाची गरज आहे!

सुखाच्या सोबतीने यार हे आयुष्य कळते का?
खरे जगणे कळाया खास दुःखाची गरज आहे!

२.

लाजसुद्धा ऐनवेळी सोडता यावी
चेहऱ्यावर वक्ररेषा ओढता यावी

खेळ केला जर कुणी, मुद्दाम भिडले तर
एक खेळी मग तुलाही खेळता यावी

कोण आहे स्वच्छ धुतल्या तांदळाजोगा?
फक्त अपुली घाण तितकी झाकता यावी!

कारणे परिणाम नंतर सांग दुनियेला
वेळ आलेली तुला निस्तारता यावी

कैक वळणांचा निसरडा घाट हे जगणे
तोल सांभाळून गाडी रेटता यावी

फेकला जाशील जेव्हा दूर वाऱ्यावर
स्वार होण्याची हुशारी साधता यावी!

एकदम नाही सुचायाची तुला कविता
आतली खळबळ अगोदर ऐकता यावी!

३.

भले नव्हे हे बुरेपणाचे लक्षण आहे
चिडचिड होणे पराभवाचे लक्षण आहे

जीव लावला ज्यांनी त्यांना शिडी समजणे
तुझ्या मनाच्या खुजेपणाचे लक्षण आहे!

वेळ लागु द्या, पण देण्याची दानत ठेवा
जाणिव असणे जितेपणाचे लक्षण आहे!

बरेच अंतर निघून आलो आता आपण
अता थांबणे खुळेपणाचे लक्षण आहे!

इतकी तंद्री, इतक्या खस्ता, इतक्या धडका
वेड नव्हे तर अन्य कशाचे लक्षण आहे?

अपुल्यापुरती दुनिया झाली ज्याची त्याची
आणि म्हणे की नव्या युगाचे लक्षण आहे!

हजार वेळा हरून सुद्धा पुन्हा तयारी?
हे योद्ध्याच्या पराक्रमाचे लक्षण आहे!

.................................
राजेश्वर शेळके,
नाशिक
9423542224