१.
फूल भलते आज उत्साहात आहे
ते सुगंधाच्या म्हणे शोधात आहे
खूप दिवसांनी तुझा मॅसेज आला
छान आहे मी तुझ्या लक्षात आहे
ऐकणाऱ्याला नदी सांगून बघते
दोन काठांची कथा पाण्यात आहे
हासते गालातल्या गालात आहे
मूल बहुधा छानशा स्वप्नात आहे
जीवघेणे होत जाते प्रेम कारण
ओढ नावाचे जहर प्रेमात आहे
बोलतो दररोज चिमण्यांशी बिचारा
लेक त्याची दूरच्या गावात आहे
मी व्यथांचाही झुला बांधून घेते
एक अल्लड पोरगी माझ्यात आहे
२.
काजळी धरते दिव्याला मध्यरात्री
कोणती सय काळजाला मध्यरात्री
काय आठवते कुणा कळणार नाही
रातराणीच्या फुलाला मध्यरात्री
बाप पाणी द्यायला शेतात असतो
झोप नसते ह्या घराला मध्यरात्री
का छतावर आज ती आली नसावी
चंद्र कासावीस झाला मध्यरात्री
गाव ,घर, अंगण असे दाटून येते
डायरी भिजते उशाला मध्यरात्री
३.
केव्हापासुन शोधत आहे घर माझे, मी घरात माझ्या
अजूनही सापडले नाही कितीक गेल्या हयात माझ्या
संथ जरी मी वाहत असले नकोच समजू नितळ मला तू
एक त्सुनामी उधाणलेला पाहिलास का तळात माझ्या
गजबजलेल्या जगासोबती मीही कायम चालत असते
अवतीभवती असून गर्दी कोणी नसते जगात माझ्या
आज जरीही पोरे निजली डोळा माझा लागत नाही
सकाळचाही प्रश्न भुकेचा उभाच आहे पुढ्यात माझ्या
दगडाला का फुटला पाझर का ही माती रडते आहे
बहुधा कोणी राखेमधुनी सूर मिसळला सुरात माझ्या
..................................................