१.
तूच सख्या रे माझे जीवन इतके नक्की आहे
श्वासांमध्ये तुझेच स्पंदन इतके नक्की आहे
कारण नसता भांडू शकतो सराव इतका झाला
नात्यांचीही सुरेख गुंफण इतके नक्की आहे
"तू वागवले" " मीही टिकले" वाक्ये बोथट झाली
दोघांच्याने घरास घरपण इतके नक्की आहे
नात्यांमध्ये घट्ट असू दे मैत्री, प्रेम,जिव्हाळा
विश्वासाची व्हावी उधळण,इतके नक्की आहे
भेटत जाते तुला मी, जशी नदी सागरा भेटे
जीवन-समिधा तुलाच अर्पण,इतके नक्की आहे
गुणी लेकरे माझी भारी, नटखट तुझीच कॉपी
दंगामस्ती, घर नंदनवन इतके नक्की आहे
जन्मोजन्मी काय करावे याचे पाहू नंतर
या जन्माचे पक्के बंधन,इतके नक्की आहे
२.
नुसतीच व्यर्थ बडबड कामात येत नाही
कर्माशिवाय किंमत शब्दात येत नाही
रडती मुले उपाशी तोंडात घास नाही
कष्टाशिवाय दाणा जात्यात येत नाही
प्रेमात माफ सारे ,समजून घे जरासे
रुसव्याशिवाय गोडी नात्यात येत नाही
चिंतेत लेकरांच्या लटकून बाप मेला
फासाशिवाय पैसा खात्यात येत नाही
सोडून पक्षनिष्ठा,सत्तेत तो निघाला
ईडीशिवाय खुर्ची गोत्यात येत नाही
लखलाभ बंगला अन् दौलत तुलाच अवघी
भाग्याशिवाय आई वाट्यात येत नाही
लढले तुझ्याचसाठी शिवशंभु थोर झाले
भीमाशिवाय समता डोक्यात येत नाही
....................................................
