१.
खेळायाला वाव समजलो
आयुष्याला डाव समजलो
ठसठस वाटे हवीहवीशी
सुंदर होता घाव समजलो
ओळखणारे कुणीच नाही...
खूप बदलले गाव समजलो
निंदेस्तव मित्रांच्या ओठी
माझे आले नाव समजलो
मंदिर, मठ धुंडाळत होतो
ईश्वर चारी ठाव समजलो
२.
रोज स्वतःशी लढावयाचा प्रसंग येतो
अन् हरल्याचे बघावयाचा प्रसंग येतो
काय कुणाला सांगायाचे दुखणेखुपणे
मजेत आहे म्हणावयाचा प्रसंग येतो
इतके सुंदर डोळे रोखुन बघू नको ना
डोळ्यांमध्ये फसावयाचा प्रसंग येतो
सरळपणाने कुठे जगाचे काम चालते
उभ्या जगाशी नडावयाचा प्रसंग येतो
रित्या नदीला बघुन रडू ना फुटे नभाला
मला स्वतःला रडावयाचा प्रसंग येतो
३.
हतबलतेच्या पाशामध्ये करकचलेले जगणे
जगतो आहे कसा तरी हे गुरफटलेले जगणे
आवरता आले ना काही सावरताही आले
बघत राहिलो डोळ्यांदेखत विस्कटलेले जगणे
धडपडलो,पडलोही, उठलो धडपडलो नंतरही
धडपडण्यातच पटाईत हे धडपडलेले जगणे
जिथे जिथे गेलो मी जेव्हा तिथेच अडकुन पडलो
स्वतःच विणल्या पाशांमध्ये अडकवलेले जगणे
जगत राहिलो बघत राहिलो जगण्याच्या खेळाला
खेळच केला ! हे जगण्याने खेळवलेले जगणे
..................................................