१.
एक पाटी असावी मंदिराच्या पुढे
धर्म मोठा नसावा माणसाच्या पुढे
मानली हार नाही वादळाच्या पुढे
लाख येतील संधी जिंकण्याच्या पुढे
मान्य, आहेस मोठा रुक्ष निवडुंग तू
ऐक! नमशील नक्की केवड्याच्या पुढे
जीवघेणे नको ते वार आता पुन्हा
भिंत मोठी उभारू काळजाच्या पुढे
थेंबभर तेल नाही चेतवाया दिवा
थांबली रात्र काळी उंबऱ्याच्या पुढे
सोड मतभेद सारे वाद मिटवू जुने
फार झाला दुरावा साहण्याच्या पुढे
२.
मूर्खपणाचा फक्त घातला सदरा आहे
तोच तर खरा 'नंबर वन चा चतरा' आहे
विषय वासना, अहंकार अन् जळकी वृत्ती
मनात त्याच्या ठासुन भरला कचरा आहे
खराखुरा सुत्रधार दडला पडद्यामागे
मंचावरचा फक्त बळीचा बकरा आहे
ओठावरचे हसणे नकळत सांगुन गेले
काळजामधे एक कोपरा दुखरा आहे
खरेच इतकी तुला आठवण येते माझी?
की, तो केवळ गझलेमधला मिसरा आहे?
कुणास तृप्ती, कुणास पश्चात्ताप मिळाला
ज्याच्या त्याच्या कर्माचा हा निचरा आहे
एक चिमुरडी बघून काळिज बधीर झाले
पोटासाठी जिने माळला गजरा आहे
३.
मनावर राज्य करते गूढ आसक्ती
सहन करते तिची दिनरात नालस्ती
अघोरी कृत्य करते एक आकांक्षा
निरंतर वाढते आहे तिची शक्ती
किती बिनघोर होउन झोपते वस्ती?
तिच्याभवती भरवसा घालतो गस्ती!
दिव्याची वाहवा! करते सदा दुनिया
मुक्याने जाळते काया अगरबत्ती
कुणी नवजात अर्भक फेकले आहे
मजबुरी वा कदाचित भोवली मस्ती!
हृदय तर मी दिले आहे तुला माझे
कशाला मग पगारावर तुझी जप्ती?
कुणी म्हणतो दगड आहे कुणी मूर्ती!
जशी ज्याची नजर त्याची तशी भक्ती
किती पडतोय भारी एक प्यादाही
शिताफीने तुझा सांभाळ तू हत्ती!
....................................................
निशा डांगे/नायगांवकर