१.
सुखाचे ऋतू तर दिमाखात आले
कधी कष्ट माझे प्रकाशात आले?
मनाने तुला मानले आपले मी
तुझे गाव माझ्या नकाशात आले
पुढाऱ्यास जमली न पारख कुणाची
शिलेदार कोठे प्रभावात आले?
वयाने तुझ्या शंभरी पार केली
तरी पोक्तपण ना स्वभावात आले
जगाची खुली एवढी पाठशाळा
खुजेपण असे का विचारात आले
नभाने दिली बातमी पावसाची
पुन्हा सुख धरेच्या महालात आले
कशाला करू विठ्ठला आज वारी?
तुझे रूप माझ्या शिवारात आले
२.
ओल थोडी काळजाला पाहिजे
जाण आली माणसाला पाहिजे
बिंब का हे वाटते फसवे तुझे?
प्रश्न केला आरशाला पाहिजे
मांडला नाहीस तू मुद्दा तुझा
रंग चढला भांडणाला पाहिजे
ज्ञानगंगा वाहते दारातुनी
ज्ञानतृष्णा साधकाला पाहिजे
गाळतो अश्रू बळी पाण्याविना
जाग आली पावसाला पाहिजे
ऐट नुसती काय कामाची तुझ्या?
ध्येय काही जीवनाला पाहिजे
काव्य लिहिणाऱ्यांस ना तोटा इथे
फक्त खोली आशयाला पाहिजे
३.
किती माणसांच्या जमावात मी!
तरी ना कुणाच्या प्रभावात मी
सुखांनी मला दूर केले सदा
जगावे कसे या अभावात मी?
जगासोबती नाळ मी जोडली
कसा स्वार्थ आणू स्वभावात मी?
इथे वादळाची हवा भोवती
उभी काळजीच्या पडावात मी
उताराकडे चालले जीवना
कशी वाट चालू चढावात मी?
तशा मैफली रोज मी जिंकते
तरीही सुरांच्या सरावात मी
तुझा भास माझ्या विचारांमधे
बुडाले स्मृतींच्या तलावात मी
...................................................
अर्चना देवधर,
रत्नागिरी
