Showing posts with label मनीषा नाईक. Show all posts
Showing posts with label मनीषा नाईक. Show all posts

तीन गझला : मनीषा नाईक


 

१.


एकानंतर दुसरी केली

मी वारी जन्मांची केली


तुकडे-तुकडे जोडत गेले

आठवणींची रजई केली


डोळ्यांमध्ये आले पाणी

दुःखाची मी होडी केली


'येतो' म्हणून निरोप आला

नीटनेटकी साडी केली


तुझ्याप्रमाणे नियतीनेही   

कायम माझी फजिती केली 


जगू लागले सुखात नंतर 

मागिल पाटी कोरी केली 


चढाओढ मी नाही केली

रेघ स्वतःची मोठी केली


मी आनंदी दिसू लागले

मी चिंतेची होळी केली


२.


किती जिवाची तगमग झाली तू दिसल्यावर

आणखी काय घडणे बाकी तू दिसल्यावर


गर्दीत अचानक पाठलाग करू लागते

या नजरेची होते हरिणी तू दिसल्यावर 


एक रिकामा पडका वाडा मनात असतो

मनात गजबजलेली वस्ती तू दिसल्यावर


भुलून जाते हरवत जाते स्वप्न पाहते

मी सोळाची असते युवती तू दिसल्यावर


तुझ्या दिशेने धावत सुटते भान सोडुनी

माझी होते अल्लड मुलगी तू दिसल्यावर


एक बासरी मनात माझ्या वाजत असते

मीही असते राधा वेडी तू दिसल्यावर


३.


पूर कसा आला डोळ्यांना 

मनातला कुठला ढग फुटला


जितके खोल मनात उतरते

उधाण येते आठवणींना


स्वप्नाच्या फांदीवर बसते

उंच झुले आशेचा झोका 


नको नको भेटूस मला तू

पुन्हा प्रेम आषाढ वेदना


तुला द्यायचे असेल काही

तुझा मला दे वेळ जरासा 


मी उडण्याचा प्रयत्न केला

हात टेकले आभाळाला


मनात येईल फुलपाखरू

मनात आहे बाग फुलांचा


एकांताची भिती वाटते

पाठलाग चालतो स्मृतींचा

.................................................