Showing posts with label आरती पद्मावार. Show all posts
Showing posts with label आरती पद्मावार. Show all posts

तीन गझला : आरती पद्मावार

 



१.


आयुष्याची छोटी घागर नियती हलवत गेली

व्यथा तळाशी बसली होती नियमित ढवळत गेली


जरी मारल्या मी रेघोट्या वाळूवरती त्याच्या

लाट निरंतर आली आणिक त्यांना मिटवत गेली


चष्मा नव्हता डोळ्यावरती अगतिक आले पाणी

धूळ वावटळ रस्त्यामध्ये जेव्हा उडवत गेली 


फरक फारसा वणव्यावरती कोठे पडला होता

वीज नभातिल त्याच्यामधुनी जरिही तळपत गेली


सुरुवातीला खतपाणी मी जरी घातले होते

नंतर नंतर व्यर्थ पिपासा नुसती खटकत गेली


२.


का पुलकित व्हावे इतके, ओथंबुन आल्यावर घन

सांगा ना अवकाळीने झाले का कुठले सिंचन


फिरवून पांढरी तुरटी तो बसला जरिही खाली

आलाच गाळ वर थोडा ढवळून काढल्यावर मन


चर्चा अन् कौतुक  झाले, तेजस्वी झाले जीवन

जो मार्ग निवडला त्याने,तो होता खडतर, निर्जन


नसतेच खरोखर तेव्हा मज भरकटण्याची  चिंता

मी स्वतःस घालुन घेते नियमांचे कडवे बंधन


काळोख संपला काळा वहिवाट प्रकाशित झाली

अंतरात तेवत होते तेजोमय एक निरांजन


केलेस चांगले झाले तू 

स्वतःमधे परिवर्तन

मधुगंध पसरला दुरवर, जगण्याचे झाले चंदन


कष्टी वर दुःखी झाला  देहाचा वृक्ष निरंतर

तत्क्षणात  उडुनी गेला आशेचा रावा भुरकन


३.


तिला समजून पाचोळा तुडवले काल ज्याने

समजले टाच चिरल्यावर डिवचली काच त्याने


निघुन वाऱ्यासवे गेला फसवले ऐनवेळी

कशाला पावसाची आस दाखवली ढगाने


नजर भिडवायची होती तशी नजरेस त्याच्या

खरोखर घात झाला ना अवेळी लाजल्याने


फिदा होते कधीकाळी फिरवली पाठ आता

किती झाली पुढे परवड नशिब रुसले कशाने


मिळाली वाट थोडीशी निरंतर चालण्याने

दिला कोठे मला पर्याय कडव्या जीवनाने


घरी राहू कुठे शकली तिच्या लेकीकडे ती

परत मग आणले होते रिकाम्या भोपळ्याने


बहिण-भावामधे नाते पुढे उरलेच नाही

मिळवला हक्क होता वारसाचा कायद्याने

.................................................