Showing posts with label सय्यद चाँद तरोडकर. Show all posts
Showing posts with label सय्यद चाँद तरोडकर. Show all posts

तीन गझला : सय्यद चाँद तरोडकर

 



 

१.


भोवती पसरलेले हे धुके  विरत नाही

जायचे जिथे आहे, वाट ती दिसत नाही


तू दिला दगा की मी? हा विषय पुरे झाला

चालते उगा चर्चा, मार्ग पण निघत नाही


लागलीय  पुढच्याला ठेच  खूप वेळा मग

का अजूनही काही मागचा शिकत नाही


संपला उन्हाळा अन् पावसातही भिजलो

आग काळजामधली का बरे विझत नाही


सोडले मला त्याने कोणते  नवल घडले

स्वार्थ ज्यात, ती मैत्री फारशी टिकत नाही 


जे मिळेल, त्याला तू भाग मान नशिबाचा 

जे मनात असते ते नेमके  मिळत नाही


'चांँद' ही गझल ऐकव जा इतर ठिकाणी तू

जे जिथे पिकत असते ते तिथे विकत नाही


२.


देतोस पावसा तू हुलकावणी कशी

शेतात मी करावी बघ पेरणी कशी


कोरड घशास पडते, पाऊस थांबता

ओलावते तरीही मग पापणी कशी


रानात ओल नसता उगवेल बी कसे

घायाळ काळजाची ही बोचणी कशी


भर मोसमात दिसते आभाळ मोकळे

डोळ्यांस आवडावी मग चांदणी कशी


बरसेल ढग उद्या अन् होईल गारवा

वेड्या मनास द्यावी समजावणी कशी


३.


ती टाळते मला जरी आता बघूनही

आहे मनामधे तिची जागा अजूनही


नुसतीच नाव घ्यायला नाती जगातली

होतो न आपला कुणी, माझा म्हणूनही 

 

प्रेमात गुंग एवढा असतो पतंग की

जातो दिव्याकडे पुन्हा, काया जळूनही


होईल गाठभेट का पळभर कधीतरी

वाटा किती धुंडाळतो, आशा नसूनही 


सोसून 'चाँद' वेदना, काळीज घट्ट कर

उपयोग काय सांगना, त्रागा करूनही


....................................................

सय्यद चाँद तरोडकर,

तरोडा, ता.जि.परभणी

मो.9503447887