समजू नका ढगांनो केवळ उदक पितो
तो जर तहानला तर काळा खडक पितो
ह्या भाग्यहीन वाती जळतील ह्या कशा
ओताल तेल जितके तितके दिपक पितो
अद्याप टाकला ना डोही तिच्या खडा
तुर्तास भोवऱ्यांची नुसती झलक पितो
पाउस पडूनही बघ मरगळ पिकांवरी
नुसता हराळ-कुंदा जल-उर्वरक पितो
जाईल सांग विस्तव दोघांतुनी कसा
हाही कडक पितो अन् तोही कडक पितो
हे पोट का खपाटी हा गणपती कसा
मोदक नि खीर सगळी बहुधा मुषक पितो
मैदान मारती जे त्यांना रुमाल का?
थकवा नि घाम अश्रू त्यांचे चषक पितो
आपण पिऊन टाका अमृत खुशाल हे
मी शंकरापरी ते विष बेधडक पितो
....................................................