Showing posts with label सौ. दीपाली कुलकर्णी. Show all posts
Showing posts with label सौ. दीपाली कुलकर्णी. Show all posts

तीन गझला : सौ दीपाली कुलकर्णी

 



१.


दार उघडू दे जरा बाहेर चल 

मोकळी आहे हवा बाहेर चल


तेच ते प्रतिबिंब दिसते आपले!

चेहरा मिळतो नवा बाहेर चल


लाट,सागर अन् नदी,डोंगर, दऱ्या

सांगती काही तुला... बाहेर चल


राहिले बाकी 'स्वतःला' भेटणे 

आज गर्दीतून या...बाहेर चल


केवढ्या वाटा पुढे असतात बघ!

थांबला आहेस का? बाहेर चल


गारव्याने अन् धुक्याने वेढला

बघ ऋतू हा देखणा बाहेर चल


विश्व नसते चार भिंतीच्यामधे

व्याप कळतो केवढा! बाहेर चल


२.


केवढे हृदयात कावे ठेवले

प्रेम केल्याचे पुरावे ठेवले


सारखे सगळ्यास कोठे मानले?

वेगळे उजवे नि डावे ठेवले


पारदर्शी राहिले नाही हृदय..

जन्मभर हेवे नि दावे ठेवले


शेवटी नात्यात पोकळ आपल्या 

स्वस्थ असल्याचे दिखावे ठेवले


ठरविले धावायचे आहे किती

मग हवे तेथे विसावे ठेवले


द्यायचे बाकी न काही ठेवले 

मी मला 'त्याच्याच' नावे ठेवले


आतला वणवा कधी विझणार का?

सोबतीला आगलावे ठेवले


३.


कैक लोकांनी जिथे रस्ता बदलला

फक्त 'मी' माझा जुना चष्मा बदलला


आज पक्षांतर करावे लागले का?

मी बदलले की तसा वारा बदलला


काळजी घेतो फुलांची आज तोही

प्रेम कळले.. शेवटी काटा बदलला


जर अपेक्षेहून मिळते फार भारी 

काय चुकले.. आज जर 'प्यादा' बदलला?


लग्न झाल्यावर बदलले केवढी मी 

स्वप्न, घर, अडनाव अन्  पत्ता बदलला


आगमन झाले सुनेचे.. अन् बिघडला 

कालचा श्रावण कसा इतका बदलला?


ठेवले लपवून 'त्यांचे' मोहरे अन् 

एक खेळी खेळली...'राजा' बदलला


वाट सत्याची जगाच्या ओळखीची...

चालला अन् फक्त एखादा बदलला


नांदणे एकत्र प्रेमाने...'जमवले'

फार मी पण... तो तसा थोडा बदलला

....................................................