१.
आयुष्याचा हिशेब केला शून्यच उरते शेवटी
सुखदुःखांचा खेळ चालतो जीवन असते शेवटी!
अता सावरू म्हणता म्हणता स्वतःच हरवत चाललो
घडी एकदा विस्कटली की बसतच नसते शेवटी!
कवि असण्याची इतकी किंमत देणे आले जाणतो
दुःख जगाचे कविता होते मन व्याकुळते शेवटी!
नात्यांमधली ओल संपता पडझड होऊ लागते
सावरले नाही वेळेवर घर कोसळते शेवटी!
ज्यांच्यासाठी आयुष्याचा क्षणक्षण देतो हसूनी
त्या अपुल्यांचे परकेपण हृदयाला डसते शेवटी!
वठल्यानंतर एकाकीपण भाळी येइल कदाचित
ह्या चिंतेने झाड बिचारे झुरतच सुकते शेवटी!
आयुष्याचे सत्य खरोखर फारच दाहक जाण तू
वास्तवतेचे ऊन पसरता स्वप्नच विरते शेवटी!
फार अपेक्षा ठेवत जगणे घातक असते कदाचित
सावध व्हावे स्वतःच आपण मृगजळ ठरते शेवटी!
संस्कारांचा पगडा खूपच जाचक असतो सांगतो
त्रास कितीही भाळी आला नारी असते शेवटी!
लक्ष्य शोधण्या कायम हिंडत असतो येथे तरीही
वाट नेहमी तुझ्या दिशेला सदैव वळते शेवटी!
२.
पहिल्यापेक्षा अधिक खोलवर कापत गेली
क्षणाक्षणाला नियती पाते परजत गेली!
मर्जी साऱ्यांची बाई सांभाळत गेली!
काय पाहिजे तिला नेमके विसरत गेली!
प्रवाहातही स्थिरावण्याचा प्रयत्न केला
पायाखाली वाळू अलगद सरकत गेली!
एक विषाचा प्याला पचवत नाही तोवर
नियती त्याहुन दुसरा जहाल पाजत गेली!
दुःख नेमके कसले झाले कळण्याआधी
सापशिडीच्या खेळासम ती गुंतत गेली!
अशी कोणती अडचण आली तिच्या जीवनी?
स्वतःच ती आई होण्याचे टाळत गेली!
फक्त जरासे सौख्य जीवनी मागितल्यावर
एक निराशा मनातली घोंगावत गेली!
शेवाळावर उभे राहणे कठीण होते
तरी कशी ती सहजपणाने चालत गेली?
उंचावरुनी कोसळताना माहित नव्हते
असंख्य शकले नदी आपली मोजत गेली!
कोसळणाऱ्या वटवृक्षाला सावरायला
एक कोवळी पारंबी सरसावत गेली!
३.
अंधार अंतरीचा आयुष्य जाळणारा
निष्ठूर जीवनाचे कटु सत्य सांगणारा!
बंदिस्त जाणिवांना आव्हान देत जातो
मोकाट एक पक्षी आकाश भेदणारा!
समजावतो मनाला पण ऐकते कुठे ते?
हातात थांबतो का पारा चकाकणारा?
संवाद होत नाही तोवर कसा कळावा
आकांत भावनांचा मौनात राहणारा!
नियती सदैव देते हुलकावणी सुखांना
ठरला कुणी न येथे खेळात जिंकणारा!
ही कोणती नशा जी सर्वस्व नष्ट करते?
प्रत्येक जीव येथे इर्षेत झिंगणारा !
आकाश खूप मोठे उडणे परंतु अवघड
जो तो इथे दुज्याच्या पंखास छाटणारा!
परिपूर्ण चित्र होते तेव्हाच जीवनाचे
चित्रात रंग भरतो जेव्हा चितारणारा!
....................................................