Showing posts with label श्रीराम गिरी. Show all posts
Showing posts with label श्रीराम गिरी. Show all posts

तीन गझला : श्रीराम गिरी

 



१.


घर सुखाची मांदियाळी लेक येता;

साजरी होते दिवाळी लेक येता.


शीण जातो, ताप हरतो त्या क्षणाला;

दिवस होतो पावसाळी लेक येता.


झोप कसली रात्र तर गप्पात सरते;

 जागतेही घर सकाळी लेक येता.


बहरतो वृक्षाप्रमाणे बाप तेव्हा;

 अंतरी हलते डहाळी लेक येता.


उतरते आकाश खाली तारकांचे;

भासते दुनिया निराळी लेक येता.


२.


फुकाचा का इथे जळणार आहे मी

पुन्हा आगीस ह्या कळणार आहे मी


मला तू दावतो आहेस भय कसले

पुढे मरणा तुझ्या पळणार आहे मी


अगोदर समजुनी घेतो विकारांना

पुन्हा ध्यानाकडे वळणार आहे मी


नको चिंता करू ह्या वेदनांची तू

तुला दुःखा, खरे छळणार आहे मी


उगा चर्चेत ना आला लढा माझा

कलंकाने नव्या मळणार आहे मी


मलाही पाहिजे आहे बदल दुःखा

जुनी दळणे किती दळणार आहे मी


३.


चाललेली सारखी चरफड कुठे गेली?

मी असा अन् मी तसा बडबड कुठे गेली?


थंड झाला कालचा कैसा निखारा तो

सांग धगधगती तुझी ओरड कुठे गेली?


काढली पायातली ती भिंगरी कोणी

ती तुझ्या रक्तातली धडपड कुठे गेली?


ठेवला मीही भरोसा यातनांवर पण

ह्या जिवाची शेवटी परवड कुठे गेली?


आठवेना यातले प्रेतास जळताना;

बंगले गेले कुठे,रोकड कुठे गेली ?


तोंड हे शिवले कुणी सांगाल काळाचे

बोलणारी माणसे परखड कुठे गेली?


...................................................