१.
काट्याचाही काटा काढत गेली
फक्त फुलावर दुनिया भाळत गेली
एक पोरगा दिसला नाही नंतर
एक पोरगी वाजत-गाजत गेली
दोघांमधली ओढ अनामिक उरली
अन् मर्यादा अंतर पाळत गेली
झाडू शकलो नाही कधीच अंगण
ती जाताना स्वतःस सांडत गेली
जीर्ण मनाची कडी कुरकुरत असते
उगा वाटते, 'कुणी' वाजवत गेली
बाप कसा ओघळला नसता सांगा
लेक हुंदका ज्याची दाबत गेली
तिरडीवरचे पोर उपाशी दिसले
गर्दीही मग हळूच पांगत गेली
२.
तिच्या झिरपत्या पान्ह्याला हे कळून चुकले आहे
तिचे लेकरू हे नाही जे तिला बिलगले आहे
कसा तुझ्या नंतर सुध्दा मी जिवंत आहे सांगू
नियतीच्या वाऱ्याने माझे पान पलटले आहे
रडणाऱ्या लोकांना पिल्लू हसून सांगत होते
शांत बसा, मी आईला आत्ताच निजवले आहे
त्यानंतर कुठल्या व्यसनाची नशाच चढली नाही
जेव्हापासुन या डोळ्यांनी तुला रिचवले आहे
तिचा उखाणा तिच्याच या वाक्याने परका झाला
"तुझा चेहरा आठवतो पण नाव विसरले आहे"
खून असावा झाला याचा कुठे सुगावा नाही
इतकी सुंदर तिरडी आणि प्रेत सजवले आहे
अशाप्रकारे मला विसरली आहे ती या जन्मी
जणू कुण्या विधवेने अपुले कुंकू पुसले आहे
३.
दगडामधल्या देवालाही पाझर फुटला असता
अजून थोडा भक्तीचा जर अभिनय जमला असता
भिजली असती रात्र तुझीही उदास केविलवाणी
तुझ्या उशाशी कधी कोवळा श्रावण निजला असता
तुला माहिती होती इतकी घुसमट शब्दांची तर
फक्त लाजरा डावा डोळा हळूच मिटला असता
अंधाराची सुद्धा गफलत झाली असती , जेव्हा
काळोखाचा दिवा अवेळी मधेच विझला असता
ऐन पावसामधे तिला जर सुचली नसती कविता
पाउस सुद्धा कधी पावसाखाली भिजला असता ?
कळली असती घुसमटतेची नवी तीव्रता त्याला
घुसमटलेला वारा माझ्या कुशीत शिरला असता
माणुसकीच्या व्याख्येचे जर केले असते चिंतन
घाव तुझ्याही हृदयावरचा उठून दिसला असता
धाय मोकलुन रडली नाही फार चांगले झाले
रडवेलासा शेर चितेला उगाच सुचला असता
....................................................
राहुल नंदकिशोर कुलकर्णी,
देवपूर, धुळे
